
हातखंबा जि.प. गटामध्ये शासकीय योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत : समाजकल्याण सभापती अॅड.सुयोग कांबळे
रत्नागिरी : हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या अंतर्गत येणार्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचल्या पाहिजेत, यासाठी शासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयातून काम केले पाहिजे. त्यासाठी मी कायम तुमच्यासोबत आहे. या विभागात शासकीय योजनांच्या माहिती व अपूर्ण प्रस्तावांसाठी लाभार्थ्यांच्या सोयीसाठी गावनिहाय संबंधित विभागाकडून विशेष कॅम्प लावण्यात येतील, असे प्रतिपादन प्रभाग संघ अध्यक्ष तथा जि. प. समाज कल्याण सभापती अॅड. सुयोग कांबळे यांनी केले.
हातखंबा जि. प. गट प्रभाग संघाची सभा नुकतीच सभापती अॅड. सुयोग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी विविध शासकीय विभागांच्या योजना व विकास कामे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध योजना जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्याचे सांगण्यात आले. तसेच मागेल त्याला काजू, ॲग्रीस्टॅक, इ-केवायसी, फळपिक विमा, शेतकरी कर्ज योजना याबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. त्याचसोबत जि. प. गटामध्ये असणाऱ्या पाणी योजना व रस्ते, साकव व विविध विकास कामांच्या सद्यस्थितीचा आढावा शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत यांच्याकडून घेण्यात आला. तसेच पावसाळ्यामध्ये साथरोग उद्भवू नयेत याकरिता आरोग्य विभागाला सतर्क राहण्याबाबत सांगण्यात आले.
या सभेला समिती सचिव तथा पंचायत समिती गटविकास अधिकारी प्राजक्ता शिरधनकर, प्राथमिक आरोग्य केंद्र खानू, ग्रामीण रुग्णालय पाली, पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, केंद्रप्रमुख, महसूल मंडळ अधिकारी, पशुधन अधिकारी, जि. प. बांधकाम विभाग अधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. याच सोबत हातखंबा, नाणीज, निवळी, पाली, कशेळी, खानू, साठरे, वळके, कापडगाव, चरवेली, वेळवंड या गावचे सरपंच, उपसरपंच, प्रशासक उपस्थित होते.



