
मुंबई ते अलिबाग २५ मिनिटांत देशातील पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल वॉटर टॅक्सीची चाचणी यशस्वी!
मुंबई : महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या अलिबाग येथे मुंबईहून जाणे आता आणखी सुकर आणि अतिजलद होणार आहे. मुंबईहून मांडवा, अलिबागला आता लवकरच केवळ २५ मिनिटांत पोहोचता येणार आहे.
कारण देशातील पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल प्रवासी वॉटर टॅक्सी मुंबई ते अलिबाग प्रवासासाठी सज्ज झाली आहे. या वॉटर टॅक्सीची चाचणी यशस्वी झाली असून आता केवळ या वॉटर टॅक्सीच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्याबरोबर १६ प्रवासी क्षमतेच्या वॉटर टॅक्सीचे लोकार्पण होईल आणि मुंबई ते अलिबाग प्रवास केवळ २५ मिनिटांत होईल.
मुंबईकरांचे पर्यटनासाठीचे आवडते ठिकाण म्हणून अलिबागची ओळख आहे. त्यामुळेच अलिबागला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रो-रो, प्रवासी बोटी आणि रस्ते प्रवासाने अलिबाग गाठण्याकडे प्रवाशांचा कल आहे. रस्ते प्रवासाने अलिबागला जाण्यासाठी अडीच ते तीन तास, रो-रोने एक तास तर प्रवासी बोटीने सव्वा ते दीड तास लागतो. पण आता लवकरच हे अंतर केवळ २५ मिनिटांत पार करता येणार आहे. पर्यावरणपूरक जलप्रवासासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने इलेक्ट्रिक बोटी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार स्वीडिश सागरी तंत्रज्ञान कंपनीने कॅन्डेला पी १२ ही इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल वॉटर टॅक्सी, पाण्यावर तरंगणारी बोट नुकतीच मुंबईत दाखल केली आहे. या वॉटर टॅक्सीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून लवकरच या सेवेचे लोकार्पण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांची वेळ मिळाल्याबरोबर ही सेवा सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या या बोटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही २५ नॉट्स (सुमारे ४६ किमी/तास) वेगाने धावते. त्यामुळे प्रवासाचा वेळ प्रचंड कमी होतो. त्याचवेळी या टॅक्सीची रचना पाहता प्रवास वेगवान तर होतोच, पण आरामदायीही होतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॅन्डेला पी १२ या वॉटर टॅक्सीला देवयान असे नाव देण्यात आले असून या वॉटर टॅक्सीची प्रवासी क्षमता १६ प्रवासी अशी आहे. या वॉटर टॅक्सीला एकदा चार्ज केल्यानंतर ती चार ते पाच वेळा मुंबई ते अलिबाग प्रवास करू शकेल. वातानुकूलित आणि आरामदायी असा हा प्रवास असून मनोरंजनासाठी एलईडी स्क्रीन आणि इतर सुविधाही या वॉटर टॅक्सीत पुरविण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक अशी ही वॉटर टॅक्सी प्रायोगिक तत्त्वावर आधी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, अलिबाग अशी चालविली जाणार आहे. तर तिचा विस्तार पुढे गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ, गेटवे ते एलिफंटा असा केला जाण्याची शक्यता आहे. तसेच यापुढे अशा आणखी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सी मुंबईत दाखल करण्याचे नियोजन सागरी मंडळाचे आहे.
मुंबई ते अलिबाग प्रवासासाठी १५०० रुपये मोजावे लागणार?
रो-रोने मुंबई ते अलिबाग प्रवासासाठी ३९० ते ४६० रुपये असे तिकीट एका व्यक्तीला आहे. तर प्रवासी बोटीने हा प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीला १३५ ते ३०० रुपये मोजावे लागतात. अशावेळी वेगवान वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी मात्र एका व्यक्तीला १५०० रुपये मोजावे लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही बोट खासगी कंपनीच्या माध्यमातून चालविली जाणार आहे. त्यांच्याकडून अंदाजे १५०० रुपये असे तिकीट आकारले जाण्याची शक्यता असून लवकरच तिकीट दर आणि वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. या वॉटर टॅक्सीचा प्रवास अतिवेगवान आणि आरामदायी आहे. केवळ २५ मिनिटांत मुंबई ते अलिबाग प्रवास करता येणार असल्याने तिकीट दर अधिक वाटत असले तरी त्याला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, याला कसा प्रतिसाद मिळतो हे ही सेवा सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल.




