अतिक्रमण हटविताना व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या राजापूर तालुका व्यापारी संघाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; बाजारपेठेतील मूलभूत सुविधा, पार्किंग आणि अग्निसुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी

राजापूर : शहरातील बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य नियोजन करावे. तसेच बाजारपेठेतील व्यापारी आणि ग्राहकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाने केली आहे. यासंदर्भात व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २६) राजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शासनाच्या आदेशानुसार राजापूर शहर बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेची भौगोलिक परिस्थिती, व्यापाऱ्यांच्या व्यावहारिक अडचणी तसेच ग्राहकांच्या सोयी-सुविधांचा विचार करून ही कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका व्यापारी संघाने मांडली आहे. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला व्यापाऱ्यांचा विरोध नसून, ही कार्यवाही करताना व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि बाजारपेठेतील आवश्यक सुविधांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बाजारपेठेतील दुकानांमध्ये ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी झडपांची आवश्यकता आहे. त्यामुळे किमान १२ फूट लांबीच्या व्यापारी झडपांना परवानगी देण्यात यावी. मात्र, या झडपांमुळे कचरा वाहने आणि अग्निशामक बंबाच्या ये-जा करण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठेतील अग्निसुरक्षेच्या दृष्टीने लहान अग्निशामक बंबाची खरेदी करण्याची सूचनाही व्यापारी संघाने केली आहे.
बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानांसमोरील जागेत वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन व्यापारी संघाने आपल्या सदस्यांना केले आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या दुचाकींसाठी नगरपरिषदेने स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय दुकानांबाहेर मालाची मांडणी करून रहदारीला अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना व्यापाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. बाजारपेठेतील अनावश्यक विद्युत तारा, टेलिफोन वायर, टीव्ही केबल तसेच अडथळा ठरणारे विद्युत आणि टेलिफोनचे खांब हटविण्यात यावेत, अशी मागणीही व्यापारी संघाने केली आहे.
बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याबाबत व्यापारी संघाची सकारात्मक भूमिका आहे. मात्र, कारवाई करताना व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक अडचणींकडे दुर्लक्ष होऊ नये. बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था, अग्निसुरक्षा, ग्राहकांची सुरक्षितता आणि व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी आवश्यक सुविधा या सर्व बाबींचा समतोल राखून नगरपरिषदेने निर्णय घ्यावा. त्यासाठी व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, दीनानाथ कोळवणकर, राजेंद्र नवाळे, विवेक गादीकर यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button