
महापौर कार्यालयासह मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; आयुक्त अश्विनी भिडे यांनाही धमकीचा ई-मेल
मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना गुरुवारी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला. महापौर कार्यालयात २६ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी स्फोट घडवण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली. तसेच पुढील ३० दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी हातबॉम्बने हल्ले करण्याचा आणि २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला. मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनीच हा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान निर्माण झाले.
या ई-मेलमध्ये महालक्ष्मी, विज्ञान आणि आचार्य अत्रे या मेट्रो स्थानकांवर स्फोटके पेरल्याचा दावा करण्यात आला आहे. जुहू येथील अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाचाही संभाव्य लक्ष्य म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवण्याची धमकी देतानाच मुंबईत पुढील महिनाभर हातबॉम्ब हल्ले करण्याचा इशाराही देण्यात आला. ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा, १९८४ मधील शीखविरोधी दंगलींचे संदर्भ तसेच ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ आणि ‘बब्बर खालसा’ या संघटनांची नावे नमूद करण्यात आली आहेत. धमकीच्या ई-मेलचा उगम आणि तो पाठवणाऱ्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. ई-मेलमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष स्फोटके ठेवण्यात आली आहेत का, याचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. धमकीतील दावे आणि प्रत्यक्ष सुरक्षा तपासणीचे निष्कर्ष यांची पडताळणी सुरू आहे.
धमकीचे ई-मेल वारंवार प्राप्त
दरम्यान, मुंबईतील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांना, सार्वजनिक ठिकाणांना आणि मेट्रो स्थानकांना लक्ष्य करण्याच्या धमक्या यापूर्वीही वारंवार देण्यात आल्या आहेत. जून, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये महापौर कार्यालय, मुंबई महापालिका मुख्यालय, शाळा, न्यायालये, विमानतळ, बँका, महालक्ष्मी रेसकोर्स आणि अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाचा उल्लेख असलेले धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. यापूर्वीच्या काही घटनांमध्ये तपासणीदरम्यान संशयास्पद वस्तू आढळल्या नव्हत्या. मात्र, वारंवार अशा धमक्या मिळत असल्याने त्यांचा उगम शोधणे आणि प्रत्येक वेळी सुरक्षा तपासणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरत आहे.




