रत्नागिरीच्या चित्पावन ब्राह्मण मंडळात आजपासून भगवान परशुराम व्याख्यानमाला

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे उद्यापासून (२६ नोव्हेंबर) भगवान परशुराम व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला तीन दिवस दररोज सायंकाळी ५.३० वाजता मंडळाच्या जोशी पाळंद , रत्नागिरी येथील भगवान परशुराम सभागृहात होणार आहेत.
उद्या (२६ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध पंचांगकर्ते, खगोल शास्त्रज्ञ आणि ज्योतिर्विद विद्याधरशास्त्री करंदीकर हे “धर्मशास्त्र आणि मुहूर्त” या विषयावर व्याख्यान देतील. पंचांग गणित, ज्योतिषशास्त्र, मंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयांत त्यांचा गाढा अभ्यास आणि विशेष प्रावीण्य आहे. ते ‘ज्योतिष मार्तंड’ म्हणून ओळखले जातात. पारंपारिक आणि खगोलशास्त्रीय पद्धतीने पंचांगाची अचूक गणिते मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते महाराष्ट्र ज्योतिष परिषद, मुंबईतील शुक्ल यजुर्वेद संस्थान, ज्योतिर विद्यालय तसेच अहमदाबाद येथील सप्तर्षि ज्योतिष परा विद्यापीठ यांसारख्या अनेक नामांकित संस्थांशी संलग्न आहेत.
सण-उत्सव, तिथी, मुहूर्त आणि ग्रहांची स्थिती यांबाबत समाजात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी ते विविध माध्यमांतून (उदा. व्याख्याने, लेख आणि मुलाखती) मार्गदर्शन करत असतात. ते पारंपारिक भारतीय कालगणना आणि आधुनिक खगोलशास्त्र यांचा समन्वय साधणारे ज्येष्ठ पंचांगकर्ते म्हणून ओळखले जातात.केवळ गणितापुरते मर्यादित न राहता, विविध व्रते, उपवास आणि धार्मिक विधींसाठी ‘धर्मसिंधू’ व ‘निर्णयसिंधू’ यांसारख्या प्राचीन ग्रंथांतील नियमांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण ते देतात.
प्राचीन भारतीय ‘सूर्यसिद्धांत’ आणि आधुनिक वेधशाळांची (Observatories) आकडेवारी यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी पंचांग गणितातील क्लिष्ट बाबी सुटसुटीत करण्यावर संशोधन केले आहे. ज्योतिषविषयक मासिके, दिवाळी अंक आणि परिषदांच्या स्मरणिकांमधून विपुल शास्त्रीय लेखन केले आहे. पंचांग शुद्धी, अधिक मास आणि क्षय मास यांचे गणित, तसेच वास्तुशास्त्र व मंत्रशास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत.
अनेकदा दोन पंचांगांमध्ये तिथींच्या फरकामुळे (दिवाळी लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, गणेशोत्सव किंवा ग्रहणकाळ) याबाबत समाजात संभ्रम निर्माण होतो. अशा वेळी करंदीकर शास्त्री गजानन ज्योतिषालय यांसारख्या माध्यमांतून किंवा व्याख्यानांद्वारे नेमका शास्त्रीय आधार स्पष्ट करतात.
शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता विजय भिडे हे “भविष्यवेध व त्या संदर्भातील समूह मनाच्या संकल्पना” (पर्यावरण व शिक्षण) या विषयावर व्याख्यान देतील. विष्णुगुप्त शैक्षणिक प्रकल्प आणि समूहमनाच्या संकल्पने संबंधित गेली ४० वर्षे त्यांचे काम चालू आहे. या कामासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांनी सन २००१ मध्ये स्टेट बँकेतील नोकरी त्यांनी सोडली आणि दिवस रात्र या कामाला त्यांनी वाहून घेतले. सध्या शिक्षण आणि पर्यावरण या बाबतीतील समस्या या बाबतीत सामान्य नागरिक काय करू शकतात, या संदर्भातील काम त्यांच्या प्रकल्पात केले जाते. कशेडी – पोलादपूर येथे ते भव्य सूर्यनारायण मंदिर उभारत असून तेथील शेतघर व काही एकर जागा ही ह्या पर्यावरण प्रकल्पासाठी त्यांनी राखून ठेवली आहे. शनिवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता धामणी- संगमेश्वर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार श्रीनिवास पेंडसे हे “श्री मद् भगवतगीता — कालातीत तत्त्वज्ञान” या विषयावर व्याख्यान देतील. रामकथा, आद्य शंकराचार्य आणि भारतीय तत्त्वज्ञान व अध्यात्माशी संबंधित विषयांवर ते प्रवचने देतात. तसेच लोकमान्य टिळक, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर त्यांची व्याख्याने प्रसिद्ध आहेत. कोकणचा इतिहास व व्यक्तींवर आधारित लेखन त्यांनी केलेले आहे.
व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष असून सर्वांना विनाशुल्क आहे. सदरहू तिनही दिवसांच्या व्याख्यानांचा आस्वाद सर्व रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन चित्पावन ब्राह्मण मंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button