रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरच नाहीत! ८६ पैकी ६७ पदे रिकामी, रुग्ण वाऱ्यावर!

…अन्यथा रुग्णालयाचे गेट बंद करावे लागेल- ठाकरे युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयच गेली कित्येक वर्ष व्हेन्टीलेटरवर आहे. रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नाहीत मग रुग्णालय सुरु कशाला ठेवलेय. याबाबत लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करावा अन्यथा जिल्हा शासकीय रुग्णालयाचे गेट बंद करावे लागेल असा ईशारा ठाकरे युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे. रुग्णांना येथे आल्यानंतर जर कोल्हापुर-मुंबईला हलवा असे सांगितले जात असेल तर रुग्णालय कशाला सुरु? असा सवालही त्यांनी उपस्थीत केलाय.
पालकमंत्री उदय सामंत गेली 5 टर्म या तालुक्याचे प्रतिनिधित्व करतायेत. पण जिल्हाशासकीय रुग्णालयाची दुरावस्था ते सुधारू शकले नाहीत ह्याचं वाईट वाटतं. गेल्या टर्म जावूदे पण यंदा तरी जिल्हा शासकीय रुग्णालयाची वाताहत आपण थांबवा आणि गोरगरीब जनतेला होणारा त्रास तसेच आर्थिक भुर्दंड पासून मुक्त करा अशी भावनिक साद सावंत यांनी यावेळी घातली.

अधिकृत माहिती नुसार शासन निर्णय क्र. पदनि-२०२२/प्र.क्र. २४६/२०२२/वैसेबा-२, दि. १६.०६.२०२३ अन्वये मंजूर असलेल्या पदांची वस्तुस्थिती अत्यंत धक्कादायक आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात एकूण ८६ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त १९ डॉक्टर कामावर आहेत. तब्बल ६७ पदे रिक्त आहेत.

१) गट-अ: प्राध्यापक
मंजूर – २०, भरलेली – ०१, रिक्त – १९

भरलेलं एकमेव पद: जनऔषधवैद्यकशास्त्र

रिक्त – १९ विभाग: शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषधशास्त्र, विकृतीशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, न्यायवैद्यकीशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, कान, नाक, घसा शास्त्र, बधिरिकरणशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, छाती व क्षयरोगशास्त्र.

२) गट-अ: सहयोगी प्राध्यापक
मंजूर – २६, भरलेली – नियमित ०४ + कंत्राटी ०२ = ०६, रिक्त – 20

रिक्त असलेले विभाग: शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, न्यायवैद्यकीशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, बधिरिकरणशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, आपत्कालीनचिकित्सा शास्त्र, दंतशास्त्र.

३) गट-ब: सहाय्यक प्राध्यापक
मंजूर – ४०, भरलेली – नियमित ०४ + कंत्राटी ०७ = ११, रिक्त – २९

पूर्णपणे रिकामे विभाग: जीवरसायनशास्त्र, औषधशास्त्र, विकृतीशास्त्र, न्यायवैद्यकीशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र, कान, नाक, घसा शास्त्र, बधिरिकरणशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, छाती व क्षयरोगशास्त्र, आपत्कालीनचिकित्सा शास्त्र.

याचा फटका कुणाला?
जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णाला बालरोग, स्त्रीरोग, हाडांचे, डोळ्यांचे, कान-नाक-घशाचे तज्ज्ञ डॉक्टरच मिळत नाहीत. आपत्कालीन विभागातही डॉक्टर नाहीत. त्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यात हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत किंवा कोल्हापूर-मुंबईला जावे लागत आहे, ह्यासारखे दुर्दव्य नाही अशी खंत प्रसाद सावंत यांनी व्यक्त केली.

ही कागदावरील आकडेवारी नाही, ही रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रोजची जिवंत वस्तुस्थिती आहे. शासनाने ही ६७ रिक्त पदे तात्काळ भरावीत, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा प्रसाद सावंत यांनी दिलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button