
‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेची धाराशिवमधून सुरुवात करणार :- ना. उदय सामंत

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी धाराशिव येथे खासदार श्री. ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकारातून आयोजित भव्य नोकरी महोत्सवाला उपस्थित राहून हजारो तरुण-तरुणींशी संवाद साधला.
युवकांच्या हाताला काम देणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देणं, यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. तरुणांनी केवळ नोकरी मिळवण्यापुरतं मर्यादित न राहता, भविष्यात नोकरी देणारे उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहावं, असं आवाहन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केलं.
उद्योग विभागाच्या माध्यमातून आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून करण्याचं यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर केलं.
याअंतर्गत गावागावांत सर्वेक्षण करून नवउद्योजकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच धाराशिव जिल्ह्यात संरक्षण क्षेत्रातील उद्योग, लॉजिस्टिक पार्क आणि एमआयडीसीच्या विकासासंदर्भात लवकरच विशेष बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवमध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासह स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास प्राधान्य देणार आहोत असे सांगत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणारे खासदार श्री. ओमराजे निंबाळकर आणि सर्व आयोजकांचे मनापासून अभिनंदन केले.




