
मी अजून काहीच उघड केलेले नाही, राहुल नार्वेकर प्रकरणी संजय राऊत यांचे सूचक विधान!

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या जमीन व्यवहारांमध्ये आदिवासींच्या जमिनींचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे. पण हे आरोप नसून सत्य आहे असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. उद्या आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला, तर तो प्रश्नही येऊ दिला जाणार नाही, असे म्हणत मी अजून काहीच उघड केलेले नाही असे सूचक विधानही संजय राऊत यांनी केले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राहुल नार्वेकरांवर झालेले हे आरोप नसून सत्य आहे. 100 टक्के त्यांनी मला नोटीस पाठवली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी मला नोटीस पाठवणे गरजेचे आहे. राहुल नार्वेकर यांच्याशी माझे वैयक्तिक भांडण नाही. त्यांनी जमीन, डोंगर, तलाव काय, समुद्रही घ्यावा. प्रत्येक जण आपल्या ऐपती आणि कुवतीप्रमाणे खरेदी करत असतो. आता महायुती सरकारमधील नेते आणि अधिकाऱ्यांची कुवत एवढी वाढली आहे की, ते बेफामपणे जमिनी घेत सुटले आहेत. नार्वेकर यांच्याशी माझे वैयक्तिक भांडण नाही. त्यांचे आणि माझे संबंध जवळचे आहेत. मात्र, 20 आदिवासींचा आक्रोश त्यांनी ऐकला पाहिजे. हे एक रॅकेट असते. आधी कुणालातरी आदिवासींची जमीन खरेदी करायला लावायची आणि नंतर फेरफार करून त्याच्याकडून ती जमीन विकत घ्यायची. 20 आदिवासींची घरे बुलडोझर लावून उद्ध्वस्त करण्यात आली. त्यांच्याकडे कुळकायद्यानुसार कागदपत्रे आहेत. सरकारी आवास योजनेतून त्यांना घरे बांधून देण्यात आली होती. मात्र, त्यांना पर्यायी जागा देण्यात आलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.
राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. या प्रकरणात काही आदिवासींचे व्हिडीओ दाखवण्यात आले. त्यामध्ये त्यांची कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. या सरकारमध्ये पैसे देऊन आमदार-खासदार विकत घेता येतात, तर मग यांच्या बाजूने बोलण्यासाठी लोकांना काय अडचण आहे? ज्या 20 आदिवासींची घरे बुलडोझरखाली उद्ध्वस्त झाली, त्यांच्याशी बोला. राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळात एक सुंदर ब्रिटिशकालीन चेंबर तयार केले आहे. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यानंतर अशा प्रकारचे चेंबर कुणाचेही झालेले नाही. अशा चेंबरमध्ये त्यांनी 20 आदिवासी कुटुंबांना बोलवावे, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करावे. कुणीतरी आपल्याविरोधात तक्रार केली आहे आणि तक्रार करणारे आदिवासी आहेत, एवढा तरी विचार केला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन सातत्याने या विषयावर संघर्ष करत आहेत. त्या संघर्ष करत असताना नार्वेकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली नाही. आपण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहात, हे विसरू नका. जमीन खरेदी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, 20 आदिवासींचा आक्रोश आणि त्यांची घरे उद्ध्वस्त होणे हा संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाचा प्रश्न आहे. उद्या आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला, तर तो प्रश्नही येऊ दिला जाणार नाही. आणि त्यांची बाजू मांडणार कोण? चंद्रशेखर बावनकुळे. हा विधानसभा अध्यक्षांच्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे. बावनकुळे हे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आदिवासींच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे. मग त्या 20 आदिवासींना बोलवा आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. ते निरक्षर आहेत. त्यांना लिहिता-वाचता येत नाही. त्या कागदपत्रांवर त्यांचे अंगठे घेण्यात आले आहेत. मी अजून काहीच उघड केलेले नाही. मला कोर्टात जाण्याच्या धमक्या देऊ नका. आमचे संपूर्ण आयुष्य कोर्टात आणि पोलीस ठाण्यांमध्ये संघर्ष करण्यात गेले आहे. आम्ही चळवळीतले लोक आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.
कुलाब्यातील महायुतीचा मोठा नेता कोण?
कुलाब्यातील प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मिंधे गटातील लोकांबाबत फार सहानुभूतीने बोलण्याची गरज नाही. हे सगळे पैशाने विकत घेतले जाणारे लोक आहेत. त्यांना पाच-पन्नास लाख रुपये दिले असतील. हे पैशाने विकत घेतले जाणारे लोक होते. मात्र, कुलाब्यात पैसे देणारी व्यक्ती कोण आहे? ज्या व्यक्तीचा महानगरपालिका निवडणुकांशी थेट संबंध होता आणि ज्याचे संपूर्ण कुटुंब त्या निवडणुकीत उतरले होते, असे म्हटले जाते, ती व्यक्ती कोण आहे? आणि मग हे पन्नास लाख रुपये वाटण्यात आले असतील, तर त्या पैशांचा स्रोत काय आहे? याबाबत कोण तक्रार करणार? अँटी करप्शन ब्युरो की ईडी? केवळ पन्नास लाख रुपयांच्या एका अधिकृत व्यवहारावरून ईडीने मला तुरुंगात टाकले होते. मग हे पन्नास लाख रुपये कुलाबा भागातील एका व्यक्तीला निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले असतील, तर त्या व्यक्तीविरोधात सुमोटो तक्रार दाखल करून तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे. या व्यवहारात कोणाचा स्वार्थ होता आणि लाभार्थी कोण होते, हे लोकांसमोर आले पाहिजे. मला माहीत आहे की, लाभार्थी कोण आहेत. जर तुम्ही पैसे दाखवत असाल, तर पैसे देणाऱ्याचे नावही उघड केले पाहिजे. सामाजिक हितासाठी हे नाव जाहीर केले पाहिजे. यामध्ये कुणीही असो, साधा कार्यकर्ता असो किंवा अन्य कोणी असो. जसे काल अलिबागच्या प्रकरणात मी नाव घेऊन सांगितले की, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचा यामध्ये हात आहे, त्याचप्रमाणे संबंधित कार्यकर्त्यांनीही सांगितले पाहिजे की, मला 50 लाख रुपये कोणी दिले? आता निवडणुका होऊन जवळपास एक वर्ष होत आले आहे. कोणी दिले 50 लाख रुपये? ही काही साधीसुधी रक्कम नाही. माझा काहीही संबंध नसताना 50 लाख रुपयांच्या प्रकरणात मला तुरुंगात जावे लागले, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांचे संपूर्ण राजकारण धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात आणि काम करण्यात गेले, असे माझे मत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात जिवंत ठेवण्याचे काम शरद पवारसाहेबांनी केले. त्यांचे वारसदार, मग ते कुटुंबातील असोत किंवा पक्षातील, त्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
आज आम्ही जो विचार मांडतो, त्यामागे यशवंतराव चव्हाण आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा फार मोठा वारसा आहे. प्रत्यक्ष राजकारणात शरद पवार यांचाही वारसा आहे. मात्र, काही लोकांना सत्तेत जाण्याची घाई झाली असेल आणि त्यातून सत्तेसाठी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार गुंडाळला जात असेल, तर मला ते योग्य वाटत नाही. यामुळे शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला आणि विचारप्रवाहाला गालबोट लागेल. स्वतः पवारसाहेब अशी भूमिका घेतील, असे मला वाटत नाही. मात्र, प्रत्येक राजकीय पक्षात दोन प्रवाह असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पक्षातही असे दोन प्रवाह असू शकतात, एवढेच मला सांगायचे आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
‘तुम्ही आता आराम करा, आम्ही तुमचा पक्ष फोडून तुम्हाला आराम करायला बसवले आहे,’ असे मोदींना म्हणायचे असेल. असे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटली पाहिजे. ज्या शरद पवारसाहेबांनी अडचणीच्या आणि संकटाच्या काळात तुम्हाला मदत केली, तुम्हाला संरक्षण दिले, त्यांचाच पक्ष तुम्ही फोडलात, त्यांचे घर तुम्ही फोडले. ज्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींचे पंतप्रधानपद वाचवले आणि अमित शहा यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी मदत केली, तीच शिवसेना तुम्ही फोडली. आणि आता पुन्हा शहाजोगपणाने म्हणता की, तुम्ही आराम करा, विश्रांती घ्या, आम्ही देश सांभाळू. मोदींसारख्या व्यक्तीने देश सांभाळणे हे भयंकर आहे. मोदी ज्या प्रकारे देश सांभाळताना दिसतात, त्यामुळेच लोकांनी बंड केले आहे आणि ते रस्त्यावर उतरले आहेत. हे पवारसाहेबांना माहीत आहे.
पवारसाहेब आमच्याबरोबर या सर्व आंदोलनांमध्ये सहभागी आहेत. स्वतः सुप्रिया सुळेही आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे असा विचार करतील, असे मला अजिबात वाटत नाही. सुप्रिया सुळे या प्रखर फुले-शाहू-आंबेडकरवादी आहेत. त्या मोदी-शहांसारख्या धर्मांध लोकांबरोबर जातील आणि महाराष्ट्राचे नुकसान करतील, असे मला तरी वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
हा निर्णय कोणीही वैयक्तिक पातळीवर घेणार नाही. इंडिया ब्लॉक म्हणून हा निर्णय घेतला जाईल आणि त्यामध्ये आम्ही सर्व सहभागी असू. हा सामूहिक निर्णय असेल. आम्ही इंडिया ब्लॉकचे सदस्य आहोत. माननीय उद्धव ठाकरेसाहेब यांनी सांगितले आहे की, इंडिया ब्लॉक म्हणून जो निर्णय होईल, तो आम्हाला बंधनकारक असेल. मी वैयक्तिक निर्णय घेणार नाही. मग इंडिया ब्लॉकमध्ये असण्याचा उपयोग काय? मी इंडिया आघाडीमध्ये आहे आणि माझा निर्णय वेगळा आहे, असे होऊ शकत नाही. तसे असेल तर आपण इंडिया ब्लॉकमधून बाहेर पडले पाहिजे. मतदारसंघ पुर्नर्रचना विधेयकाला पाठिंबा द्यायचा, पण एनडीएबरोबर जायचे नाही, असे जर पवार यांच्या पक्षाने ठरवले, तर त्याला नैतिकता म्हणत नाहीत. बाहेरून पाठिंबा देऊन काय मुले होतात का? लग्न करावे लागते, नाहीतर घटस्फोट घ्यावा लागतो, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
2022 साली दोन आमदार सुरतवरून परत येऊ इच्छित होते. मात्र, त्यांना ठार मारण्याचा कट होता. माझ्या माहितीनुसार, प्रकाश आबिटकर हेसुद्धा परत येऊ इच्छित होते. ते आता आरोग्यमंत्री आहेत. त्यांनी सुरुवातीला तिथून परत फिरण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर प्रचंड दबाव होता आणि त्यांना तिथेच अडकवून ठेवण्यात आले, असे संजय राऊत म्हणाले.
नितीन देशमुख यांच्यावर अशा प्रकारचे औषधोपचार करण्यात आले किंवा त्यांना इंजेक्शन देण्यात आले की, त्यांना हृदयविकाराचा झटका येईल आणि त्यांचा तिथेच मृत्यू होईल. हा एक कट होता. कैलास पाटील जेव्हा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला किंवा रस्त्यावर त्यांना जायबंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अप्रत्यक्षपणे मंत्री संजय शिरसाट यांनीही तेच सांगितले होते की, काही आमदारांवर ‘राम नाम सत्य है’ म्हणण्याची वेळ आली होती. माझ्याकडे याची तीन उदाहरणे आहेत. प्रकाश आबिटकर, कैलास पाटील आणि अकोल्याचे नितीन देशमुख. यापैकी नितीन देशमुख यांनी तिथून पळ काढला आणि ते व्यवस्थित बाहेर पडले. कैलास पाटील अर्ध्या रस्त्यातून उतरले आणि काही मैल चालत आले. त्या वाहतुकीतून जाताना त्यांच्या जिवाला अपाय होण्याची शक्यता होती. तरीही ते मागे परतले. ही तीन प्रकरणे मला माहीत आहेत. बाकीच्या इतर आमदारांना जबरदस्तीने कोंडून ठेवण्यात आले होते, असेही संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी या विषयावर बोलताना म्हटले होते की, आमदार असतील किंवा मंत्री असतील, त्यांनी कमी बोलावे आणि कामावर लक्ष द्यावे. फार बोलण्याच्या भानगडीत पडू नये. मग त्यांचे ऐकतो कोण? कोणी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहे, तर कोणी अशा प्रकारे आमदारांच्या हत्येच्या संदर्भात मुलाखती देत आहे. त्यांचे ऐकतो कोण? असे संजय राऊत म्हणाले.
या क्षणी आम्ही मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भात असलेल्या विधेयकावर चर्चा करत आहोत. महिला आरक्षणाच्या नावाखाली खासदारांची संख्या 860 करण्याचा हा प्रस्ताव आहे. आमच्या सर्वांचे म्हणणे आहे की, सध्या जेवढे खासदार आहेत, त्याच संख्येत महिला आरक्षण द्या. 860 खासदार कशाला पाहिजेत? 860 खासदार करण्यासंदर्भातील या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी दोनतृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. ते या सरकारकडे नाही. त्यामुळे या सरकारने आणि अमित शहा यांच्या गटाने पक्ष फोडायचे, पक्ष विकत घ्यायचे किंवा थेट क्रॉस व्होटिंग करायचे, असे आव्हान दिले आहे. दीडशे कोटी रुपये घेऊन जा, एका मतासाठी दीडशे कोटी रुपये, अशी भाषा केली जात आहे. यावरून 860 खासदारांचे हे विधेयक भाजपसाठी किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट होते. हे विधेयक देशासाठी नाही, तर भाजपसाठी महत्त्वाचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.
हे विधेयक एकदा लोकसभेत कोसळले आहे आणि तेही मोठ्या फरकाने कोसळले. आता अमित शहा जिद्दीला पेटले आहेत. जोपर्यंत माझ्याकडे आवश्यक आकडा होत नाही, तोपर्यंत मी हिवाळी अधिवेशन घेणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही मस्ती आहे. अशा वेळी आम्ही सर्वांनी ठरवले पाहिजे की, लोकशाहीच्या नावाखाली ही मस्ती चालणार नाही. आम्ही हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. आमचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेले आहे. त्याला तुम्ही याच चौकटीत मान्यता द्या आणि 546 खासदारांच्या सध्याच्या संख्येतच त्याची प्रक्रिया पूर्ण करा. यावर जर कुणाला असे वाटत असेल की, अमित शहा आणि मोदींकडे जाऊन बूट चाटले पाहिजेत, तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
इंडिया ब्लॉक म्हणून सर्वांनी एकत्रित निर्णय घेतला पाहिजे आणि त्या निर्णयाशी आम्ही बांधील राहिले पाहिजे. ममता बॅनर्जीही ठामपणे उभ्या आहेत. माझ्या माहितीनुसार, स्टॅलिन यांचा पक्षही अद्याप या विधेयकाला विरोध करत आहे. द्रमुक पक्ष आज इंडिया ब्लॉकमध्ये नसला, तरी त्यांचा विरोध आहे. आम्ही सर्वजण या विधेयकाच्या विरोधात आहोत. एका विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी दीडशे-दीडशे कोटी रुपयांना एक खासदार विकत घेण्याची भाषा या देशात केली जाते. मग कुठे आहे लोकशाही? कुठे आहे संविधान? आणि कुठे आहे राजकारणातील नैतिकता? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
मला या क्षणी कोणीही वेगळी भूमिका घेताना दिसत नाही. अमित शहा यांचे एजंट वेगवेगळ्या मार्गांनी चर्चा करत आहेत. मी त्यांना एजंटच म्हणतो. ते मुंबईत येतात, अन्य प्रांतांमध्ये जातात आणि नेत्यांशी चर्चा करतात. ते वेगवेगळ्या प्रकारे वातावरणनिर्मिती करत आहेत. ‘बात कर लो, ये होगा, कोर्ट में निकाल लगेगा,’ अशा प्रकारच्या चर्चा ते घडवून आणत आहेत. हे एजंट सर्वत्र फिरत आहेत. ते कुठे कुठे फिरत आहेत, कोणकोणत्या कार्यक्रमांमधून नेत्यांना गाठत आहेत, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. कोणाकोणाला फोन केले जात आहेत, हेसुद्धा आमच्याकडे आहे. या एजंटांचे दलाल असलेल्या भाजपच्या लोकांना असे वाटत असेल की, ते गेम चेंज करू शकतात, तर तसे होणार नाही. गेम चेंज होणार नाही, पण रेजिम चेंज होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
अमित शहा अधिवेशन घेत नाहीत, कारण त्यांचा अहंकार आडवा येत आहे. जोपर्यंत माझ्याकडे मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक बहुमताचा आकडा तयार होत नाही, तोपर्यंत मी अधिवेशन घेणार नाही. अधिवेशनाला आलो, तर पुन्हा एकदा हे विधेयक आणून ते मंजूर करूनच जाईन. तोपर्यंत अधिवेशन घेणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. हा लोकशाहीचा फार मोठा अपमान आहे. लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेचा हा अपमान आहे. हा संविधानाचा अपमान आहे. याचा विचार देशाने केला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.




