जागतिक दिव्यांग दिनी रत्नागिरीत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

लांजा: जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जयस्तंभ येथे हे उपोषण होणार असून यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

त्रिपाठी यांनी जिल्हाधिकारींना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, दिव्यांगांच्या हक्कांसाठी असलेला निधी, विविध शासकीय योजना आणि सुविधांच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या दिव्यांगांसाठी राखीव एक टक्के निधीतून व्यवसायासाठी तीनचाकी इलेक्ट्रिक रिक्षा उपलब्ध करून द्याव्यात, दिव्यांगांसाठी आमदारांकडून दरवर्षी खर्च करण्यात येणारा ३० लाख रुपयांचा निधी तातडीने खर्च करावा तसेच नगरपपरिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातील राखीव तीन टक्के निधीचे वितरण त्वरित करावे.

याशिवाय सर्व दिव्यांगांना अंत्योदय धान्य योजनेचा लाभ विनाअट देण्यात यावा, जिल्हा परिषद सेस फंडातून गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तीनचाकी स्कूटर दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्वरित मिळाव्यात, प्रत्येक तालुक्यात दिव्यांग समस्या निवारण समिती स्थापन करून त्यात प्रहार संघटनेच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे.

त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या रोजगारासाठी नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत शासन निर्णयानुसार २०० चौरस मीटर जागा अथवा स्टॉल उपलब्ध करून द्यावेत. सर्व आस्थापनांमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी तयार करून नियमानुसार पदोन्नती द्यावी. दुर्गम भागातील नियुक्तीमुळे केंद्रप्रमुख पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या उपोषणात जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. प्रशासनाने दिव्यांगांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यांची पूर्तता करावी अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

या निवेदनावर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, उत्तर जिल्हाप्रमुख शैलेश पोस्तुरे, दक्षिण जिल्हाप्रमुख सुशांत मराठे, सचिव संतोष माळशे, उपाध्यक्ष यशवंत कांबळे, पाचल उपाध्यक्ष खानविलकर आणि सहसचिव पावस्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button