हातखंबा येथे गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त; १.७५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, ट्रकचालक अटकेत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातखंबा येथे कारवाई केली. या छाप्यात ‘रॉयल ब्लू व्हिस्की’चे १,४०० बॉक्स जप्त करण्यात आले असून, मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकसह एकूण १ कोटी ७५ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा येथील ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हातखंबा परिसरात सापळा रचला होता. मुंबई-गोवा महामार्गावरून संशयित सहाचाकी ट्रक येताच पथकाने तो थांबवून तपासणी केली. वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित ‘रॉयल ब्लू व्हिस्की’चे मोठ्या प्रमाणावर बॉक्स आढळून आले. परराज्यातील मद्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने संपूर्ण साठा जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या १,४०० बॉक्समधील मद्याची किंमत १ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेला सहाचाकी ट्रकही जप्त करण्यात आला. मद्यसाठा आणि वाहनाची एकत्रित किंमत १ कोटी ७५ लाख १४ हजार रुपये इतकी असून, या कारवाईमुळे महामार्गावरील अवैध मद्यवाहतुकीला मोठा धक्का बसला आहे.

अटक केलेल्या ट्रकचालकाविरोधात संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, या मद्याची वाहतूक नेमकी कुठून आणि कोणासाठी केली जात होती, तसेच या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतला जात आहे. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी परिसरात बेकायदेशीर मद्यविक्री किंवा वाहतूक आढळल्यास तत्काळ विभागाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button