
गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धेला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल ७५ स्पर्धकांचा सहभाग!
युवासेना रत्नागिरी शहराच्या उपक्रमाला युवकांचा भरघोस प्रतिसाद; शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी तरुणाईचा पुढाकार

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याच्या गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासोबतच युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने युवासेना रत्नागिरी शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शहरस्तरीय गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धा २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत तब्बल ७५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून, युवकांच्या या उत्साहामुळे संपूर्ण शहरात स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. उदय रवींद्र सामंत आणि राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘शिवरायांचा इतिहास जपूया, युवा कलागुणांना वाव देऊया’ हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारण्याची संधी मिळाली आहे. केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता इतिहासाची आवड, सर्जनशीलता आणि स्वराज्याविषयी अभिमान जागवणारा हा उपक्रम ठरत आहे.
७५ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग ही या उपक्रमाची मोठी उपलब्धी असून, रत्नागिरीतील तरुणाईला शिवरायांच्या इतिहासाशी जोडण्याचा युवासेनेचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे स्वराज्याचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता तो कृतीतून आणि कलाकृतीतून पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत असते.
ह्या संपूर्ण स्पर्धेची पहाणी नगरसेवक अभिजीत दुडे, युवासेना पदाधिकारी सर्वेश शेलार अथांग कदम रोहित मायानक अभिषेक पेजे लोभस देसाई प्रथमेश साळवी युवराज शेट्ये शुभम साळवी गौरव शिंदे स्वामी चवंडे प्रणित चिले मानस गुरव दुर्वेश पांगम आणि पदाधिकारी उपस्थित होते.




