दांडेआडोम येथे मंगळवारी कार्तिक स्वामी दर्शनाची दुर्मिळ पर्वणी

रत्नागिरी : वर्षातून केवळ एकदाच होणाऱ्या कार्तिक स्वामींच्या दर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी यंदा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील एकमेव कार्तिक स्वामी मंदिर असलेल्या मौजे दांडेआडोम येथे मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विशेष दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पौर्णिमा तिथी आणि कृत्तिका नक्षत्र यांचा दुर्मिळ संयोग जुळून आल्याने या दर्शनाचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढले असून, भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

परंपरेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृत्तिका नक्षत्र असतानाच महिला आणि सर्व भाविकांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. यंदा २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजून २ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असल्याने हा संपूर्ण काळ दर्शनासाठी सर्वोत्तम आणि अत्यंत शुभ मानला जात आहे. या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याने वर्षभर घरात सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि धनधान्य नांदते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कार्तिक स्वामींना प्रिय असलेली लाल फुले, कणेरीची फुले, कमळ तसेच मोराचे पीस अर्पण करावे. नैवेद्यासाठी लाडू, खडीसाखर, डाळिंब आणि केळी अर्पण करण्याची परंपरा आहे. रत्नागिरी तालुक्यातील हे एकमेव मंदिर असल्याने दरवर्षी येथे मोठी गर्दी होते. मंदिराकडे जाण्यासाठी मारुती मंदिर, कोकण नगर, विमानतळ, शीळ आणि फणसवळे फाट्याच्या पुढील डावीकडील रस्त्याने दांडेआडोम येथे पोहोचता येते. या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी उमेश जाधव (८४८४९८०९८८) किंवा धनंजय दांडेकर (९४२११४०५९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button