
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणार्यांना जनतेने घरी बसवले, गृहराज्यमंत्री योगेश कदम
’ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना जनतेने निवडणुकीत घरी बसवले,’ असा थेट टोला गृहराज्यमंत्री योगेशटी कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटावर लगावला. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करताना कदम यांनी उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ठाकरे गटाचे माजी आ. वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेनेची भूमिकाही स्पष्ट केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा समाचार घेताना कदम म्हणाले की, २०१४ मध्ये महायुतीचे संख्याबळ कमी पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही. अन्यथा त्यांनी त्याच वेळी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन केली असती. २०१९ मध्ये संख्याबळ जुळून आल्याने त्यांनी तशी अंमलबजावणी केली. उद्धव ठाकरे यांची सुरुवातीपासूनच युतीची मानसिकता नव्हती. केवळ आपण मुख्यमंत्री कसे होऊ, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. स्वतः कॉंग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करायची आणि आमच्यावर आरोप करायचे, हा दुटप्पीपणा असल्याची टीका त्यांनी केली.



