दस्त नोंदवताना येणाऱ्या अडचणी दूर करणार : पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत

२८ नोव्हेंबर रोजी आयजीआरसमवेत रत्नागिरीत होणार बैठक; दररोज ६० दस्त नोंदणी करण्याचे पालकमंत्र्यांचे रत्नागिरीचे सहदुय्यम निबंधक यांना आदेश


  रत्नागिरी दि. २१ नोव्हेंबर :- येथील सहदुय्यम निंबंधक कार्यालयातील भोंगळ कारभाराबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात पालकमंत्री ना. सामंत यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी थेट संपर्क साधल्यानंतर येत्या शनिवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता राज्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्या समवेत विशेष बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवार दि. २३ नोव्हेंबरपासून दररोज ६० दस्त नोंदणी झालेच पाहिजेत असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ना. सामंत यांनी रत्नागिरीचे सहदुय्यम निबंधक श्री. खेडसकर यांना दिले आहेत. सुरवातीला रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी मागण्याचे सविस्तर निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

गेले काही महिने रत्नागिरी येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत रत्नागिरीतील वकील वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आज शनिवारी दि. २१ रोजी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे, सचिव रत्नदीप चाचले, ॲड. फजल डिंगणकर, सरकारी वकील ॲड प्रफुल्ल साळवी, ॲड. शाल्मली आंबुलकर यांच्यासह रत्नागिरीचे वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत वकिलांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. सामंत यांनी विस्तृतपणे चर्चा केली. चर्चेदरम्यान रत्नागिरीतील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार पालकमंत्री ना. सामंत यांच्या निदर्शनास आला. त्यावेळी ना. सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवसाला ५० ते ६० दस्त नोंदणी झाली पाहिजे असे स्पष्ट करताना दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना विनाकारण हेलपाटे मारायला लाऊ नका, असे स्पष्ट केले. इन्व्हर्टर तात्काळ बसवण्याचे आदेशही पालकमंत्री ना. सामंत यांनी यावेळी दिले.

*रत्नागिरी येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील एकंदरीत कारभाराबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री ना. सामंत यांनी नाराजी व्यक्त करताना राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यावेळी महसूल मंत्री ना. बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत दस्त नोंदणीसाठी वेळ लागत असेल तर कार्यालय १० वाजेपर्यंत चालू ठेवा. पण दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे, असे स्पष्ट केले.

यासंदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी राज्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्या समवेत शनिवारी दि. २८ रोजी दुपारी एक वाजता बैठक घेण्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचित केले. या बैठकीत सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सोमवारपासून दस्त नोंदणीची प्रक्रिया जलदगतीने झाली पाहिजे असे स्पष्ट करताना दररोज ६० दस्त नोंदणी झालीच पाहिजे असे आदेश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button