
१६ डिसेंबरपासून ‘जिल्हा परिषद महापुरुष चषक २०२६’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार; प्रथम येणाऱ्या ३२ संघांना संधी
रत्नागिरी, दि. २१ ) : जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळामार्फत ‘जिल्हा परिषद महापुरुष चषक २०२६ (पर्व दुसरे)’ या भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. दिनांक १६ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे ही स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धेची पार्श्वभूमी व उद्देश
रत्नागिरी जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गेली ३० वर्षे कर्मचाऱ्यांसाठी स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा व रक्तदान शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम राबवत आहे. जिल्हा परिषद आवारातील श्री महापुरुष व दत्त मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी संकलनाच्या उद्देशाने नोव्हेंबर २०२३ मध्ये या स्पर्धेचे पहिले पर्व यशस्वीरीत्या पार पडले होते. त्यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार यंदा स्पर्धेचे दुसरे पर्व आयोजित केले जात आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडेल.
बक्षिसांची लयलूट
- विजेता संघ : रोख रु. ५५,५५५/- आणि आकर्षक चषक
- उपविजेता संघ : रोख रु. ३३,३३३/- आणि आकर्षक चषक
- तिसरा व चौथा क्रमांक : आकर्षक चषक
- वैयक्तिक पारितोषिके : प्रत्येक सामन्यासाठी ‘सामनावीर’, तसेच स्पर्धेतील ‘उत्कृष्ट फलंदाज’, ‘उत्कृष्ट गोलंदाज’ आणि ‘मालिकावीर’ यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.
महत्त्वाच्या तारखा व वेळापत्रक - अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०२६
- चषक अनावरण, लॉट्स व कर्णधार सभा : १० डिसेंबर २०२६
- स्पर्धेचा कालावधी : १६ ते १८ डिसेंबर २०२६ (सायंकाळी ६.०० ते रात्री ११.००) आणि १९ व २० डिसेंबर २०२६ (दिवस-रात्र सामने).
सहभागासाठी प्रमुख अटी व नियम
१. पात्रता : रत्नागिरी जिल्ह्यातील नियमित शासकीय सेवेतील केंद्र व राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, बँका व महामंडळांचे अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होऊ शकतात. कंत्राटी किंवा बाह्ययंत्रणेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही; मात्र नव्याने रुजू झालेले कंत्राटी शिक्षक व कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी (ज्यांची सेवा ३ वर्षांनंतर नियमित होते) या स्पर्धेत खेळू शकतात.
२. संघ मर्यादा व प्रवेश शुल्क : प्रथम नोंदणी करणाऱ्या ३२ संघांनाच प्रवेश दिला जाईल. प्रवेश शुल्क रु. ५,०००/- आहे.
३. विभागीय बंधन : प्रत्येक संघ एकाच प्रशासकीय विभागाचा असणे आवश्यक असून खेळाडूंकडे नियुक्ती प्राधिकरणाचे अधिकृत शासकीय ओळखपत्र अनिवार्य आहे.
४. शिस्त व पेहराव : सर्व संघांसाठी ड्रेसकोड (टी-शर्ट व ट्रॅक पँट) आणि शूज वापरणे बंधनकारक आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
संपर्क व अधिक माहिती
इच्छुक संघांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपले परिपूर्ण अर्ज व खेळाडूंच्या ओळखपत्रांच्या प्रती सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष दिनेश सिनकर (८६६८५४०९७६ / ९०२८८३०४४८) किंवा अधिकृत प्रतिनिधी किरण वाडेकर (८२०८७५९८९७), साईस्वरुप मांडवकर (७७७६८९२२४३), पर्णिकेश सुर्वे (९९७५५५११०२) आणि अक्षय भोळे (९४०५७७२२२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




