वारकऱ्यांना पंढरपूरला घेउन जाणाऱ्या एसटी बसमधील चालक मद्यधुंद अवस्थेत, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दापोली आगारातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर, चालक निलंबित


दापोलीः- कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या दापोली तालुक्यातील पंचक्रोशी वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यंना एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा धक्कादायक अनुभव आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 300 वारकरी सहा एसटी बसमधून दापोली ते आळंदी-पंढरपूर असा प्रवास करीत असताना एका एसटी चालकाने मद्यपान केले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे वारकऱ्यांचा जीव धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत असून, संबंधित बस तब्बल चार तास एकाच ठिकाणी थांबून राहिल्याने वारकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली एसटी आगारातून सहा एसटी बस येऊन सुमारे 300 वारकरी धार्मिक यात्रेसाठी रवाना झाले होते. मात्र, प्रवासादरम्यान एका चालकाने मद्यपान केले असल्याचा आरोप झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. संबंधित चालक बसच्या स्टेअरिंगजवळ झोपून राहिल्याचेही सांगण्यात येत आहे. परिणामी, बस तब्बल चार तास एकाच ठिकाणी थांबून राहिली. अखेर चार तासानंतर दुसऱ्या चालकाची व्यवस्था करण्यात आल्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला.
या गंभीर प्रकाराची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी तातडीने दापोली एसटी आगारात धाव घेतली. विशेष म्हणजे यात्रेला रवाना होताना याच वारकऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या सुखरूप प्रवासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. मात्र, प्रवासादरम्यान वारकऱ्यांवर असा प्रसंग ओढवल्याचे समजताच भाजप कार्यकर्त्यांनी एसटी प्रशासनाला विचारण्यासाठी थेट आगार गाठले. दापोली एसटी आगारातील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी धारेवर धरत या प्रकाराबाबत सडेतोड जाब विचारला. शेकडो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असताना अशा प्रकारची निष्काळजीपणा कसा काय खपवून घेतला जातो, असा सवाल उपस्थित करण्यात आला. संबंधित चालकाची तातडीने चौकशी करून त्याचे निलंबन करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, विवेक भावे, अजय कदम, सोशल मिडिया संयोजक बापू लिंगावळे, ओंकार जोशी, ओंकार वेल्हाळ, विरू लिंगावळे, प्रमोद पांगारकर, मयुरेश वेल्हाळ आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकीकडे एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची हमी देत असताना दुसरीकडे धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या शेकडो वारकऱ्यांना अशा प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जावे लागणे ही गंभीर बाब आहे. चालकाने मद्यपान केले होते का, याची वैद्यकीय तपासणी व सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणणे आवश्यक आहे. संबंधित चालकावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, दापोली एसटी प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान सायंकाळी राज्यपरिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतुक अधिकारी यांनी संबंधित चालकाला पुढील आदेशापर्यंत निलंबित केले असून याबाबतचे पत्र दापोली आगाराला देण्यात आले आहे.
फोटो डिपी 17-01 पहिल्या छायाचित्रात एसटीमध्ये झोपलेला चालक तर दुसऱ्या छायाचित्रात जाब विचारण्यासाठी गेलेले भाजपाचे पदाधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button