
सर्व्हिस रस्त्यावरील जीवघेण्या चरामुळे अपघाताचा धोका!दुचाकीस्वार गंभीर जखमी; संबंधित विभागाने तातडीने चर बुजविण्याची वाहनचालकांची मागणी

राजापूर : शहरानजीकच्या कोदवली ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोलपंप आणि नाटे फाट्याजवळील समर्थ हार्डवेअरसमोर असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर रस्त्याच्या अगदी आडवा पडलेला मोठा चर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. सुमारे अर्धा फूट रुंद आणि एक फूट उंचीचा हा चर अपघातांना निमंत्रण देत असून, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या चरामुळे सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी वाहनांना जोरदार धक्के बसत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच वाहनांमधील प्रवाशांनाही मोठे दणके सहन करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या अगदी मध्यभागी असलेला हा चर वाहनचालकांच्या लक्षात येणे कठीण जात असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन हा चर त्वरित बुजवावा, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागी पडलेला हा चर नैसर्गिकरीत्या निर्माण झाला आहे की, एखाद्याने वैयक्तिक कामासाठी रस्ता खोदला आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही होत आहे. वैयक्तिक कामासाठी रस्ता खोदण्यात आला असल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




