पोलीस अधिकारी असल्याचे भासवून वृद्ध्येची ६० लाखांना ऑनलाईन फसवणूक


लांजा येथील घटना : सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


पोलीस अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेला अटकेची व बदनामीची धमकी देत तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लांजा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लांजा शेवरवाडी, सीनिअर कॉलेजजवळ राहणाऱ्या ७८ वर्षीय वृद्ध महिलेची ३१ ऑक्टोबर २०२६ सकाळी ९.३० ते ५ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत फसवणूक करण्यात आली. सुशांत पिसे (पूर्ण नाव, गाव, पत्ता नाही) असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादी वृद्ध महिलेला व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे पोलीस गणवेश परिधान करून आपण नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवत तुमच्या आधारकार्डचा वापर करून मुंबई येथील कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून अब्दुल रहमान नावाची व्यक्ती विविध संघटनांकडून पैसे गोळा करून तुमच्या नावावरील या खात्यात जमा करत असल्याचे वृद्ध महिलेला सांगितले. तसेच या व्यवहारातून तुम्हाला १० टक्के कमिशन दिले जात असल्याचे सांगत तिला अटकेची व बदनामीची धमकी देण्यात आली.
त्यानंतर आरोपीने वृद्ध महिलेला घाबरवून तिच्याकडून एसबीआय बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे पुणे येथील पुनित ट्रेडर्सच्या बँक ऑफ इंडिया खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. आरोपींच्या सांगण्यावरून संबंधित महिलेने वेळोवेळी रक्कम हस्तांतरित केली. अशा प्रकारे आरोपीनी एकूण ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी ७ नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात सुशांत पिसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button