
पर्यटन हंगाम सुरू, पाणीटंचाईचे सावट
दापोलीः- यावर्षाचा पर्यटन हंगाम दिवाळीपासून चांगला सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत. यंदा मोसमी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळापासून पावसाने जो काढता पाय घेतला, तो अद्याप परतलेला नाही. परतीचा पाऊसही न झाल्याने भूजल पातळीत वाढ झालेली नाही. पाण्याची घटती पातळी कायम राहिल्यास, फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाईचे तीव्र परिणाम दिसण्यास सुरूवात होईल. पाणीटंचाईचा फटका किनारपट्टी व पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना बसण्याची भीती आहे. यासाऱ्यामध्ये सद्यस्थितीत पर्यटन हंगामाची चाहुल दिलासा देणारी ठरणारी आहे. पर्यटनामध्ये पाण्याचा वापर इतर क्षेत्रांपेक्षा कित्येक पटीने जास्त असतो. समुद्रस्नानांनतर आंघोळीसाठी व स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणात पाणी लागते. स्वयंपाक, भांडी आणि दैनंदिन स्वच्छतेसाठी मुबलक पाणी अनिवार्य असते. हॉटेल्समधील बेडशीट्स, टॉवेल्स आणि कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर मोठा असतो. त्यामुळे पाण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील नियोजन सुरू झाले आहे.
यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन, जनपुनर्भरण आणि उपाययोजनांवर भर दिला जात आहे. बंधारे बांधले जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दिवाळी सणात वाढणारे बुकींग हॉटेल व्यावसायिकांसाठी आश्वासक ठरले आहे. यामुळे पर्यटनव्यवसायासमोरील अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याचा आशावाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.




