आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दल सतर्क व सज्ज

सणाचा आनंद, नागरिकांची सुरक्षा, सायबर जनजागृती आणि अमली पदार्थमुक्त रत्नागिरीसाठी प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे विशेष प्रयत्न

रत्नागिरी : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, आनंददायी व निर्भय वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क व सज्ज झाले आहे.

दिवाळी सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच सायबर व आर्थिक फसवणुकीपासून नागरिकांना सुरक्षित ठेवणे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाकडून आवश्यक खबरदारी व सुरक्षा उपाययोजना करण्यात येत आहेत.

दिवाळीच्या काळात बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त आणि गस्त वाढविण्यात येणार आहे. चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी तसेच इतर मालमत्ताविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असून रत्नागिरी पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, नागरिकांनी आपली घरे बंद करून बाहेरगावी जाताना आपल्या घराच्या सुरक्षेची काळजी घ्यावी तसेच कोणत्याही इसम/इसमांची संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ डायल ११२ या संपर्क क्रमांकावर कळवावे.

दिवाळी सणाच्या काळात ऑनलाइन खरेदी, आकर्षक सवलती, बनावट लिंक, क्यूआर कोड, डिजिटल पेमेंट, बनावट गुंतवणूक योजना, केवायसी अपडेट तसेच विविध आमिषांद्वारे होणाऱ्या सायबर व आर्थिक फसवणुकीच्या घटनांपासून नागरिकांनी सावध राहावे. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, युपीआय पिन, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय माहिती देण्यात येऊ नये तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.

सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी.

अमली पदार्थमुक्त रत्नागिरी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून अमली पदार्थाची विक्री, साठवणूक, वाहतूक व सेवन याविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमांवर भर देण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी दिवाळीचा सण सुरक्षितपणे व पर्यावरणपूरक पद्धतीने तसेच सामाजिक सलोखा जपत साजरा करावा. कोणतीही अनुचित घटना, संशयास्पद हालचाल किंवा आपत्कालीन परिस्थिती उ‌द्भवल्यास तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button