
टाटा मोटर्सचा ‘मास्टरस्ट्रोक’! जग्वारनंतर युरोपातील ‘इव्हेको’ची खरेदी, बनली जगातील ४ थी मोठी कंपनी!
Tata Motors Iveco Acquisition Merger : टाटा मोटर्स आणि इटलीस्थित इवेको या कंपन्यांच्या एकत्रीकरणातून जगातील चौथ्या क्रमांकाची वाणिज्य वाहन उत्पादक कंपनी आकाराला येणार आहे. या एकत्रित कंपनीचा वार्षिक महसूल सुमारे २.२८ लाख कोटी रुपये (२१ अब्ज युरो) असेल.
टाटा मोटर्सने इवेकोमधील ८९.४२ टक्के हिस्सा सुमारे ३.४३ अब्ज युरो खर्चून ताब्यात घेतला आहे. समभाग खरेदीची प्रक्रिया अद्याप सुरू असून, या व्यवहारामुळे इवेको ही टाटा मोटर्सची अप्रत्यक्ष उपकंपनी बनली आहे.
टाटा मोटर्सच्या इतिहासातील हा सर्वांत मोठे अधिग्रहण ठरले आहे. वर्ष २००८ मध्ये फोर्डकडून जग्वार लँड रोव्हरचे अधिग्रहण केल्यानंतरचा हा कंपनीचा सर्वांत मोठा व्यवहार ठरला आहे. इवेको समूहात सुमारे ३३ हजार कर्मचारी कार्यरत असून, जगभरात कंपनीचे १६ औद्योगिक उत्पादन प्रकल्प आणि संशोधन व विकासाची २२ केंद्रे आहेत.
इवेकोच्या सामान्य समभागांसाठी टाटा मोटर्सने प्रति समभाग १४.४ युरो रोख देण्याची खुली समभाग योजना जाहीर केली होती. या प्रक्रियेतील समभाग स्वीकारण्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील व्यवहाराचा निपटारा करण्यात आला. मात्र, उर्वरित भागधारकांना आणखी एक संधी देण्यासाठी दोन ते सहा नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाच व्यवहार दिवसांसाठी ही समभाग खरेदी प्रक्रिया पुन्हा खुली करण्यात आली आहे. या कालावधीत समभाग विक्रीसाठी सादर करणाऱ्या भागधारकांना १३ नोव्हेंबर रोजी व्यवहाराचा निपटारा केला जाणार आहे.
इटलीतील ट्युरिन येथे इवेकोच्या मुख्यालयात आयोजित जागतिक पत्रकार परिषदेत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एकत्रित कंपनीच्या व्यावसायिक क्षमतेवर आणि भविष्यातील वाढीच्या संधींवर प्रकाश टाकला. आगामी पाच वर्षांत वाहन विक्रीचे प्रमाण, महसूल आणि नफ्याचे प्रमाण (मार्जिन) यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, इटलीच्या शेअर बाजारातून इवेकोचे समभाग सूचिबद्धता रद्द (डिलिस्टिंग) करण्याबाबत टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश वाघ यांनी निश्चित कालमर्यादा सांगण्यास नकार दिला. मात्र, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकत्रित कंपनीच्या व्यवस्थापनातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची एकत्रित कंपनीच्या अध्यक्षपदी आणि वरिष्ठ बिगर कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओलोफ पर्सन हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कायम राहतील. तसेच, टाटा मोटर्सचे पी. बी. बालाजी आणि गिरीश वाघ यांचा बिगर स्वतंत्र बिगर कार्यकारी संचालक म्हणून संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.




