राजापूरमध्ये जलसंधारणासाठी वनराई बंधाऱ्याची उभारणी; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या १०० श्री सदस्यांचे श्रमदान

कोदवली गोडी नदीपात्रात १०० ते १२० फूट लांबीचा बंधारा; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषदेचा पुढाकार



राजापूर : शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्याबरोबरच पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राजापूर नगरपरिषदेने जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली आहे. या उपक्रमाला डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. समर्थ नगर, भटाळी येथील मुजावरवाडा धोबीघाटाजवळ कोदवली गोडी नदीपात्रात प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी श्रमदानातून सुमारे १०० ते १२० फूट लांबीचा वनराई बंधारा उभारला.
लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरसेवक ॲड. जमिर खलिफे यांच्या पुढाकाराने आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे १०० श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले.
या उपक्रमात प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांसह नगरसेवक सिद्धांत जाधव, नेहा तानवडे, आफरोज झारी, अमिना गडकरी आणि जान्हवी वादक यांनीही सक्रिय सहभाग घेतला. नगरपरिषदेचे नियोजन, सामाजिक संस्थेचा सहभाग आणि सामूहिक श्रमदान यांच्या समन्वयातून वनराई बंधाऱ्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
शहरातील पाण्याची उपलब्धता आणि साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हा बंधारा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा जलसंधारणाच्या उपक्रमांमुळे पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास जलसंकटावर प्रभावी उपाययोजना करता येऊ शकतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरपरिषद विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. मात्र, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांचे सहकार्यही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजापूरकरांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा आणि पाणी बचतीच्या मोहिमेत नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button