तालुक्यातील वाढत्या डेंग्यू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाचे नियोजन

डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागाची बैठक; प्रभावी सर्वेक्षणावर भर

रत्नागिरी : तालुक्यात वाढत असलेल्या डेंग्यूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज आरोग्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत डेंग्यू प्रतिबंधासाठी सर्वेक्षण करण्याबाबत नियोजन करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा हिवताप कार्यालयाच्या अतिरिक्त हिवताप अधिकारी श्रीमती मयेकर, रिजनल कॉलेज कोऑर्डिनेटर डॉ. सचिन धांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल सूर्यवंशी, विस्तार अधिकारी श्री. पुजारी, तालुका विस्तार अधिकारी श्री. वाघमारे, श्री. निवेंडकर, कीटकशास्त्रज्ञ श्रीमती मेस्त्री, आरोग्य सहाय्यक श्री. शेट्ये तसेच तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य सहाय्यक उपस्थित होते.
बैठकीमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संभाव्य जोखमीच्या भागांमध्ये सर्वेक्षण करणे, डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करण्यासाठी उपाययोजना करणे आणि नागरिकांमध्ये डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर प्रभावी सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले.
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करून झाकून ठेवावीत तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभागासोबत नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. सामूहिक प्रयत्नांतून डेंग्यूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button