पालगड येथे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम संपन्न


रत्नागिरी, दि. २६ ): बालविवाहाचे समूळ उच्चाटन करणे, बालकांचे मूलभूत हक्क जपणे तसेच मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दापोली तालुक्यातील पालगड येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत पालगड येथील प. पू. साने गुरुजी कलामंदिर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाद्वारे प्रामुख्याने आदिवासी समाजाला बालविवाहाचे गंभीर दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपायांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमाला जिल्हा संरक्षण अधिकारी (रत्नागिरी, संगमेश्वर) लहू पंगडे, जिल्हा संरक्षण अधिकारी (दापोली, खेड, मंडणगड) माणिक कांबळे, चाइल्ड हेल्पलाइन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, चाइल्ड हेल्पलाइन समुपदेशक ओंकार जाधव, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) अनिल गायकवाड, महाराष्ट्र आदिवासी कातकरी संघटनेचे मंडणगड तालुका अध्यक्ष विठोबा जगताप आणि तालुका सल्लागार कृष्णा हिलम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो (POCSO) कायदा तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी समजावून सांगण्यात आल्या. याशिवाय संकटाच्या वेळी मदतीसाठी उपयुक्त असलेले चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८, महिला हेल्पलाइन क्रमांक १८१, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कार्यपद्धती आणि शासनाच्या विविध महिला व बालकल्याणकारी योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी ‘बालविवाह करणार नाही आणि होऊ देणार नाही’ अशी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी मिळून कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांमध्ये बालहक्क, शिक्षण आणि सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button