
एसआयआरप्रकरणी चुकीचे, खोटे २४ अर्ज, धारावीत राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल!
मुंबई : मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, धारावीत मतदार यादीतील व्यक्तींच्या नावावर आक्षेप घेत नमुना – ७ चे चुकीचे व खोटे २४ अर्ज दाखल केल्याने एका व्यक्तीविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच, गुन्हा दाखल असलेली व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, नमुना ७ चे जास्तीत जास्त १० अर्ज प्रतिदिन दाखल करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शिवाय नमुना ७ मध्ये जाणूनबुजून चुकीची माहिती किंवा घोषणा केल्याचे आढळल्यास संबंधित हरकतदाराविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये कार्यवाही करण्याची तरतूद आहे. मात्र, असे असूनही धारावी विधानसभा मतदारसंघातील ९० फूट मार्गावरील गंगाधरलाल चाळीत वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीने एकाच दिवसात तब्बल २४ अर्ज दाखल केले. चुकीच्या माहितीच्या आधारे पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जावीत, याबाबत संबंधित व्यक्तीने २४ अर्ज केले होते. मात्र, सर्व अर्ज खोटे व चुकीचे असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर याप्रकरणी सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार त्या व्यक्तीविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निर्धारित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर खोटी व चुकीची माहिती देत नमुना ७ चे अर्ज दाखल केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून नियमानुसार पुढील कारवाई होईल, असे धारावी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
७ अर्ज नेमका काय?
नमुना – ७ हा मतदार यादीतील एखाद्या व्यक्तीच्या नावावर हरकत घेण्यासाठी किंवा तिचे नाव मतदार यादीतून वगळण्याची मागणी करण्यासाठी वापरला जाणारा अर्ज आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, ती दुसरीकडे स्थलांतरित झाली असेल किंवा तिची नोंद दुबार असेल, अशा कारणांसाठी हा अर्ज दाखल करता येतो. सत्ताधारी मतदार यादीत घोळ करत असल्याचा काँग्रेसचा आरोप विशिष्ट जाती – धर्माच्या लोकांची नावे मतदार यादीतून कमी करण्याचे प्रकार सत्ताधारी पक्षाकडून शिवसेना (ठाकरे) व काँग्रेसचे आमदार आलेल्या मतदारसंघात होत आहेत. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते बीएलओंना हाताशी घेऊन हा घोळ घालत आहेत. याप्रकरणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी याप्रकरणी पुरावे देखील सादर केले होते. त्यावर दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन चोक्कलिंगम यांनी दिले होते, असे काँग्रेसचे सुरेशचंद्र राजहंस यांनी सांगितले.




