
राजेंद्र शिंदेंची तब्बल 44 तास चौकशी; प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी अटक होणार?
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील (मानपाडा, घोडबंदर रोड) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कार्यालयातच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.
या प्रकरणानंतर ठाण्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संशयाची सुई राजेंद्र शिंदे यांच्यावर जात असूनही त्यांचे एफआयआरमध्ये नाव नव्हते. अखेर ठाकरे गटाने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडल्यानंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचे नाव पुरवणी एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले. गंभीर बाब म्हणजे तेव्हापासून राजेंद्र शिंदे यांची एकूण 44 तास एसआयटीने चौकशी करण्यात आली. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरतेय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
ही हत्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची झाली असून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे पती-पत्नी असून शिवसेनेचे (शिंदे) पदाधिकारी आहेत. त्यामुळे राजेंद्र शिंदे यांच्या सहावेळा झालेल्या चौकशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आतापर्यंत प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात प्रकाश ऊर्फ पप्या शिंदे, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली, अमित सिंग ऊर्फ पपलू, निखिल सुनील यादव आणि नितेश रमेश पवार यांचा समावेश आहे. यातील संतोष कनोजिया आणि अमित सिंग यांना गुरुवारी (22 ऑक्टोबर) कोर्टाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पूर्णेकरांच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली. यात 2 सहायक पोलीस आयुक्त, 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 6 सहायक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक पोलीस उपनिरीक्षक, 8 पोलीस कर्मचारी अशा एकूण 23 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या प्रकरणात प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकर याने बुधवारी (21 ऑक्टोबर) माध्यमांना व्हिडीओ दाखवत या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असल्याचा दावा केला. राजेंद्र शिंदे यांच्यासमोर आरोपी निखील यादव बंदुकीचा सराव करत असल्याचा व्हिडिओ राम पूर्णेकर याने सादर केला होता. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापले असून गुरुवारी (22 ऑक्टोबर) पोलिसांनी पुन्हा राजेंद्र शिंदे यांची चौकशी केली. उल्लेखनीय बाब म्हणजे पूर्णकरांच्या हत्येनंतर तब्बल 18 दिवसांनी (17 ऑक्टोबर) शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले होते तर सरनाईकांच्या चार दिवस आधी (13 ऑक्टोबर) एकनाथ शिंदे यांनी या हत्येसंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली होती. यावरून शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच राजेंद्र शिंदे यांची वारंवार चौकशी होत असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.
राजेंद्र शिंदे यांचे चौकशी सत्र
पहिली चौकशी
- 13 ऑक्टोबर (9 तास)
- निखिल यादव आणि नितेश पवार यांना समोरासमोर प्रश्न विचारण्यात आले
दुसरी चौकशी
- 14 ऑक्टोबर (8 तास)
तिसरी चौकशी
- 19 ऑक्टोबर (6 तास)
चौथी चौकशी
- 20 ऑक्टोबर (6 तास)
- आरोपी टल्ली आणि पपलू यांच्यासमोर बसवून प्रश्न विचारले
पाचवी चौकशी
- 21 ऑक्टोबर (6 तास)
सहावी चौकशी
- 22 ऑक्टोबर (9 तास)




