
आरवारे समुद्रकिनार्यावर पर्यटन हंगामाच्या तोंडावर बीचवरील स्टॉल्सवर वन खात्याकडून बुलडोझर
पर्यटनाच्या नकाशावर वेगाने नावारूपाला आलेल्या आरवारे समुद्रकिनार्याचा नयनरम्य परिसर सध्या एका वेगळ्याच वादाने आणि चिंतेने ढवळून निघाला आहे. पर्यटकांच्या गर्दीने गजबजणार्या या किनार्यावर ऐन पर्यटन हंगामाची सुरुवात होत असतानाच, स्थानिक ग्रामस्थांनी उभारलेल्या तात्पुरत्या स्टॉल्सवर वनविभागाने अचानक कारवाई करीत बुलडोझर चालविला आहे. पूर्वकल्पना न देता केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक स्थानिक व्यावसायिक, गरीब महिला आणि तरुण हवालदिल झाले असून, संपूर्ण परिसरात वनविभागाविरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
रत्नागिरी-गणपतीपुळे सागरी मार्गावरील आरेवारे पुलाजवळ गेल्या काही वर्षांत पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. किनार्यावर येणार्या पर्यटकांच्या सोयीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा पाणी मिळेल.
चहा, वडापाव, नारळपाणी, कोकणी नाश्ता आणि आंघोळीची साथ करणारे सुमारे २० ते २१ छोटे स्टॉल्स उभारले होते. किनार्यावरील वाळूत हे स्टॉल्स टिकून राहावेत म्हणून काहींनी माती व चिरे टाकून छोटे ओटे तयार केले होते. विशेष म्हणजे, या किनार्यावर कोणतीही दुर्घटना घडल्यास हेच स्टॉलधारक पर्यटकांच्या मदतीला धावून जात असत.
दरम्यान, या भागात वनविभागाच्या ट्री हाऊस प्रकल्पाचे काम सुरू आहे. काही लोकांच्या आपापसातील वादातून मिळालेल्या निनावी तक्रारीचा दाखला देत, वनविभागाने दोन दिवस जेसीबी आणि मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई राबविली.




