
काळाच्या ओसरीवर हरवलेली ती खिरापत..तो सुरेल फेर..!
आज पहाटे जयसिंगपूर महाविद्यालयाच्या ट्रॅकवर धावताना पावलांना नेहमीचीच गती होती. ती आपापल्या लयीत पडत होती. शेजारच्या लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या लाऊडस्पीकरवरून एक सूर हवेत तरंगत कानावर आला— ‘ऐलमा पैलमा गणेश देवा… माझा खेळ मांडून दे करितो तुझी सेवा…’ आणि एका क्षणात माझ्या पावलांचा वेग थबकला. छातीची धडधड जागीच थिजली, श्वासांची गती मंदावली आणि डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. ‘तो’ केवळ एक आवाज नव्हता; तो काळाच्या पलीकडून, हरवलेल्या बालपणाने घातलेली एक आर्त साद होती. मी ट्रॅकवर उभा होतो खरा, पण मन मात्र क्षणात चार दशके मागे धावत जाऊन नगरपालिकेच्या त्या शाळा क्रमांक सातच्या ओसरीवर जाऊन थांबले होते.
‘आड बाई आडोणी आडाचं पाणी काढोनी…आडात पडली सुपारी आमचा हादगा दुपारी..’ एकामागोमाग एक अशा कितीतरी ओळी मनाच्या गाभाऱ्यातून उफाळून वर आल्या आणि फेर धरू लागल्या. दगडी किंवा पत्र्याच्या काळ्याशार पाटीवर खडूने रेखाटलेला तो ऐटबाज हत्ती.. त्यावर भक्तिभावाने वाहिलेली पिवळीजर्द शेवंती आणि आजबाजूला मिळालेली गुलबकावलीची गुलालासारखी फुले..त्याभोवती एकमेकींचे हात घट्ट धरून गिरक्या घेणाऱ्या निष्पाप मुलींचे ते रिंगण!
शाळेच्या अगदी समोरच राहणारी, सातवीतली ती जरिना आजही लख्ख आठवते. तिच्या गळ्यातून फुटणारा तो पहिला खणखणीत सूर आणि त्या सुराला साथ देणारी बाकीच्या मुलींची लयबद्धता..टाळीचा तो नाद, ती गाणी आजही काळजाच्या एखाद्या नाजूक कोपऱ्यात इतकी खोलवर रुतून बसली आहेत. आठवण झाली तरी अंगावर शहारा उभा राहतो. आज वयाच्या या टप्प्यावर तो विचार मनाला सुखावून तर जातोच, पण त्याच क्षणी छातीत एक खोल, अनामिक हुरहूर दाटून येते—आयुष्याच्या प्रवाहात, संसाराच्या उन्हातान्हात ती जरिना आणि तिच्या त्या सख्या आज कुठे असतील? कशा असतील? त्यांनाही हस्त नक्षत्राचा पाऊस पडताना त्या बालपणीच्या हत्तीची अशीच आठवण येत असेल का?
भाद्रपद संपून अश्विन महिना उंबरठ्यावर येतो आणि आभाळाचा तळ हळूच बदलू लागतो. शेतात वाऱ्यावर डोलणारं ते तृप्त हिरवं सोनं, नुकतीच उघडीप दिलेल्या कोवळ्या उन्हाची नक्षी आणि हवेत मंद दरवळणारा, काळजाला भिडणारा त्या ओल्या मातीचा, ओल्या पिकांचा सुगंध..अशा एका संपन्न, गंधाळलेल्या ऋतूत तिन्हीसांजेच्या गारव्यात हादग्याची ती साद घुमू लागते. कुठे त्याला पश्चिम महाराष्ट्रात हादगा म्हणतात, कुठे भोंडला, तर विदर्भाच्या काळ्या मातीत भुलाई-भुलाबाई. नावं वेगवेगळी असतील, पण त्यामागे स्पंदन पावणारा आत्मा मात्र एकच, या आभाळाबद्दलची कृतज्ञता, निसर्गाशी जुळलेली नाळ आणि शतकानुशतके स्त्रीमनाने जपलेले अबोल अश्रू आणि हसू ! निसर्गाविषयीची अथांग कृतज्ञता, स्त्रीमनाचे हळवे पदर आणि पिढ्यानपिढ्या रक्तामांसात झिरपत आलेली आदिम नाती.!
सूर्य जेव्हा हस्त नक्षत्रात पाऊल ठेवतो, तेव्हा परतीचा पाऊस जणू माहेरवाशिणीच्या भेटीसाठी आसुसल्यासारखा धरणीला न्हाऊ घालतो. या हस्ताचं देखणं वाहन म्हणजे तो पांढराशुभ्र ऐरावत हत्ती. हत्ती हा केवळ प्राणी नव्हे; तो संथ, संयमी शक्तीचं आणि अखंड स्नेहाचं आदिम प्रतीक. अंगणात शेणाने सारवलेल्या जमिनीवर किंवा लाकडी पाटावर रांगोळीने हत्तीची रेखीव आकृती उमटायची. कधी सोंड उंचावून उभे असलेले दोन हत्ती, तर कधी त्यांच्या माथ्यावर लोंबकळणाऱ्या झेंडूच्या केशरी-पिवळ्या माळा. निसर्गाने ओंजळीतून भरभरून दिलेलं दान दोन्ही हातांनी गोळा करत, त्या अथांग आभाळाचे मुक्या शब्दांत आभार मानण्याची ही आपली अस्सल, जिवंत रीत.
संध्याकाळ जेव्हा सांजवेळेच्या धूसर सावलीत विरघळायची, तेव्हा घराघरांच्या ओसरीवर पैंजणांची नादमधुर रुणझुण सुरू व्हायची. हातात हात गुंफून मुलींचा फेर गल्लीत जसजसा फिरायचा, तसतशी केवळ पावलेच फिरत नसत; तर त्या सावळ्या, चिमुरड्या मनांत दडलेल्या, माहेरवाशिणीच्या अंतर्मनातल्या कित्येक भावना शब्दांवाटे आकार घेत सुरांच्या वाटेने मोकळ्या होत असत. ती गाणी म्हणजे साध्या ओळी नव्हत्या, तर सासरच्या उंबरठ्यावर उभी राहून माहेरच्या आठवणीने पाणावलेल्या डोळ्यांचे ते आर्त कंदन होते..सुरांची वर्तुळे फेर धरलेल्या मनातून पाझरत जाणारी ती गाणी म्हणजे ग्रामीण आणि कौटुंबिक जीवनाची उमटत जाणारी ती जिवंत चित्रे होती.
‘कारल्याचा वेल लावं गं सुने, मग जा आपल्या माहेरा…’ यात सासरच्या जाचाची एक हळुवार, कातर तक्रार असायची; माहेरच्या ओढीची तगमग असायची आणि संसाराची अवघड, काट्याकुट्यांची वाट चालताना एकमेकींच्या खांद्यावर डोके ठेवून मिळणारा तो आश्वासक दिलासा असायचा.
हादग्याचा तो परमोच्च, उत्कंठेचा क्षण म्हणजे ती ‘खिरापत’! रुमालाखाली किंवा डब्यात लपवून आणलेला तो खाऊ काय असेल, याचा शोध घेण्यात अख्खं बालपण उतावीळ व्हायचं. एक अथांग उत्सुकता दडलेली असायची.! पेढा, गूळ-शेंगदाणे, तांदळाची खीर, बिस्कीटे, गुडदाणी, काकडीची ताजी कोशिंबीर की फुटाणे?हजार क्लृप्त्या लढवून, चिमुरड्या खुणा ओळखून तो खाऊ शोधायचा आणि मग सगळ्यांनी मिळून एकाच पानात, एकाच ओंजळीत तो अमृतासारखा आनंदाने वाटून खायचा.
कधीकधी आमच्यासारख्या एखाद्या खोडकर, खट्याळ मुलाच्या हाती लागून तो डबा आधीच फस्त झालेला असायचा..आज त्याची आठवण झाली तरी डोळ्यात हलक्या आसवांसह ओठांवर हसू उमटते. तो निव्वळ खाऊ नव्हता, ती केवळ जिभेची चव नव्हती; तर एकमेकांचे सुख-दुःख वाटून घेण्याचा, सहजीवनाचा आणि निखळ प्रेमाचा तो एक कधीही न विसरता येणारा संस्कार होता.
काळ क्रूरपणे पुढे निघून गेला. आज सिमेंटच्या उंचच उंच जंगलात ती शेणाने सारवलेली अंगणे हरवली. फ्लॅटच्या बंद दाराआड ती पैंजणांची रुणझुण आणि संध्याकाळचे ते गोड सूर कुठेतरी कायमचे विरून गेले. भौतिक सुखांच्या मागे धावताना आपण आपली स्वतःची मुळेच कुठेतरी हरवून बसलो.बालपणीच्या त्या गोतावळ्यातली, त्या पाटीवर हत्ती काढणारी जरिना आणि त्या साऱ्या मुली आज संसाराच्या कुठल्या वळणावर, कोणत्या शहरात हरवून गेल्या असतील, हा विचारही मनाला हुरहूर लावून जातो.
आजही आश्विनातल्या हस्त नक्षत्राच्या सरी जेव्हा काचेच्या खिडकीवर येऊन आदळतात, तेव्हा मनाच्या ओसाड ओसरीवर हादग्याच्या त्या गाण्यांना पालवी फुटते. गाणी पुन्हा जिवंत होतात. हादगा हा केवळ एक खेळ किंवा उत्सव नाही; तो आपल्या मातीशी, मेघांशी, पावसाशी आणि रक्ताच्या पलीकडच्या नात्यांशी, माणसांच्या जिव्हाळ्याशी घट्ट बांधलेला एक हिरवागार पदर आहे.
आधुनिकतेच्या या धकाधकीत आणि कोरड्या स्पर्धेत मन जेव्हा जेव्हा थकून जातं, तेव्हा पुन्हा एकदा बालपणीच्या त्या वर्तुळात जाऊन, हातात हात गुंफून, आभाळाकडे डोळे लावून मनमुराद गावं वाटतं..ऐकावं वाटतं..कारण त्या सुरांमध्ये आपले आदिम मूळ घट्ट रुजलेले आहे. या हरवलेल्या सुरांमध्येच आपल्या अस्तित्वाचा खरा श्वास दडलेला आहे. त्यात कधीही न आटणारा मातीचा जिवंत ओलावा आजही तसाच श्वास घेत आहे. मातीचा कधीही न आटणारा एक जिवंत, ओलसर हुंदकाही त्यात आहे ! ©️®️ -कुसुमानंद
(प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
9403464101




