
एलॉन मस्क यांची आता थेट मुकेश अंबानींवर टीका; म्हणाले, ‘डीअर प्राइम मिनिस्टर अंबानी, तुम्हीच खरे बॉस’!
Elon Musk vs Mukesh Ambani Starlink India : उपग्रह इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी ‘स्टारलिंक’च्या भारतातील प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाने आता आणखी पेटताना दिसत आहे. भारतीय उद्योगपतींवर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या टेस्ला आणि स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी आता रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यावर थेट उपरोधिक टीका केली आहे. अंबानींना उद्देशून ‘डियर प्राइम मिनिस्टर’ असा उल्लेख करत, अधिकृत पदापेक्षाही अंबानींकडे अधिक अधिकार आणि ताकद असल्याचा खोचक टोला मस्क यांनी लगावला आहे.
मस्क यांनी शुक्रवारी याबाबत पहिली पोस्ट एक्सवर शेअर केली होती. ज्यात त्यांनी भारताचे बॉस अंबानी असल्याचा उल्लेख केला होता. आता त्यांनी नव्या पोस्टमधून थेट अंबानी यांना लक्ष्य केले आहे. “भारताचे खरे बॉस तुम्हीच आहात, ही बाब लक्षात न आल्याबद्दल कृपया मी दिलगिरी व्यक्त करतो, त्याचा स्वीकार करा”, अशी खोचक टीका मस्क यांनी केली.
स्टारलिंकला भारतीय बाजारपेठेत खुल्या स्पर्धेत उतरण्याची परवानगी अंबानी देणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भारतीय जनतेचे ‘मक्तेदारीतून होणारे शोषण’ सुरू ठेवण्याचाच अंबानींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही मस्क यांनी केला आहे.
दुर्गम व ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा मुद्दा मांडताना मस्क म्हणाले, “जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही अनेक भागांत अजूनही इंटरनेट सुविधा पोहोचलेली नाही. त्यामुळे लहान मुलांचे शिक्षण हिरावले जात असून छोट्या व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठ गाठता येत नाही. स्टारलिंक अशा घटकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते.” एवढेच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तीच्या काळात पारंपारिक दूरसंचार यंत्रणा कोलमडतात, तेव्हा स्टारलिंक अनेकांचे प्राण वाचवू शकते, असा दावा करत त्यांनी भारतातील प्रवेशाचे समर्थन केले. सलग तिसऱ्या दिवशी मस्क यांनी ‘स्टारलिंक’चा मार्ग रोखणाऱ्या घटकांवर सोशल मीडिया पोस्टमधून टीका केली आहे.
राहुल गांधींचा मस्क यांना पाठिंबा
या संपूर्ण वादात आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलॉन मस्क यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत बाजारात सर्वांना समान संधी मिळायला हवी, अशी मागणी केली आहे. “काँग्रेस पक्ष भांडवलशाहीच्या संगनमताचे दुष्टचक्र मोडून काढण्यासाठी कटिबद्ध आहे. मी व्यवसायांच्या विरोधात नसून, एकाधिकारशाहीच्या विरोधात आहे,” असे राहुल गांधी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
“स्टारलिंकला जगभरातील १६५ हून अधिक देशांत परवाने मिळाले आहेत आणि आम्ही भारताचे सर्व नियम पाळण्यासाठी ५ वर्षे खर्च केली आहेत; तरीही परवाना का नाही? अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का?” असा सवाल मस्क यांनी ‘एक्स’वर गुरूवारी उपस्थित केला होता.
त्यावर राहुल गांधी यांनी “भारतात आपले स्वागत आहे एलॉन, दुसऱ्या व्यक्तीची ओळख होईपर्यंत वाट पाहा,” असा सूचक टोला लगावला होता.
सरकारचे स्पष्टीकरण काय?
दरम्यान, देशांतर्गत बड्या उद्योगपतींच्या दबावाखाली ‘स्टारलिंक’चा मार्ग रोखला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. उपग्रह दूरसंचार सेवेचा परवाना मिळवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या अटींचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




