
आगामी काळातील संभाव्य टंचाई आराखडा १० ऑक्टोबर पर्यंत सादर करा !
खेड गटविकास अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतींना आवाहन *
खेड : – आगामी काळातील संभाव्य टंचाई आराखडा १० ऑक्टोबर पर्यंत सादर करा असे आवाहन गटविकास अधिकारी विजय करपे यांनी रजिप/ग्रापापु/तांशा-१/३२४९/२०२६ दि. २२/०९/२०२६ रोजीच्या पत्राद्वारे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना केले आहे.
आगामी उन्हाळा कालावधी लक्षात घेता तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गावातील नागरीकांना पिण्याचे पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरीता आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत संभाव्य टंचाई परिस्थितींचा पूर्वअंदाज घेऊन योग्य त्या उपाययोजनांचा समावेश असलेल्या टंचाई निवारण आराखडा त्वरीत तयार करून दि. १०/१०/२०२६ पर्यंत पंचायत समिती कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. प्रस्ताव उशिरा प्राप्त झाल्यास व आराखड्यात समावेश न झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायतींची असेल, टंचाई आराखडा तयार करताना व गावात टंचाई निवारणासाठी पुढील १० मुख्य उपाययोजनांचा प्राधान्याने समावेश करावा. असेही स्पष्ट करण्यात आले आहे . या उपाययोजना पुढीलप्रमाणे १. विंधन विहीर / कुपनलिका घेणे, २. नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरूस्ती करणे, ३. विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे. ४. तात्पुरत्या पूरक नळपाणी पुरवठा योजना करणे. ५. टैंकरने पाणी पुरवठा करणे. ६. खाजगी विहिर अधिग्रहीत करणे. ७. प्रगतीपथावरील पाणी पुरवठा करणे, ८. बुडक्या घेणे. ९. विहिर खोलकरणे/विहिरीतील गाळकाढणे.१०. नळ पाणी पुरवठा योजनेच्या स्वोताजवळ स्वोत बळकटीकरण करणे. अशा या दहा उपाययोजना असून त्यांचा समावेश करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.




