
दापोलीत घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा आरोप; ९८ हजारांचा ऐवज गायब
जालगाव विद्यानगरमधील घटना; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार
घरात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलेनेच मालकाच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा प्रकार दापोली तालुक्यातील जालगाव विद्यानगर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात ९८ हजार २८२ रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालगाव येथील रवींद्र गंगाराम क्षीरसागर यांच्या घरी ४३ वर्षीय महिला स्वयंपाकाचे काम करीत होती. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्यापूर्वी घरातील सदस्यांची नजर चुकवून कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये विविध वजनांची चार चांदीची निरांजने, चांदीची वाटी, चांदीचा करंडा, सुमारे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मुलांचे ब्रेसलेट, ०.३२० ग्रॅम वजनाची सोन्याची सटवी आणि ५०० रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंची एकूण किंमत ९८ हजार २८२ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घरातील दागिने आणि रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर क्षीरसागर यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.




