शौर्य दिन व सेवा संकल्प अभियानात चिपळूणमध्ये शूरवीरांच्या त्यागाला सलाम; विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेची प्रेरणा


रत्नागिरी, दि. ३० ): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘शौर्य दिन’ व ‘सेवा संकल्प अभियाना’तंर्गत शूर जवानांच्या अतुलनीय त्यागाला कृतज्ञतेची मानवंदना देत वीर माता-पिता, वीर नारी, माजी सैनिक आणि वीरपत्नींचा (माजी सैनिक विधवा) सन्मान सोहळा चिपळूण येथील गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला.
युनायटेड इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल एच. एन. भागवत (निवृत्त, PVSM, AVSM, VM) उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि अमर जवान स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात “सॅल्यूट टू रिअल हिरो” (Salute to Real Hero) या उपक्रमांतर्गत जिजाऊ महिला ब्रिगेडच्या सदस्या व युनायटेड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माजी सैनिकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. नव्या पिढीकडून मिळालेला हा आदर पाहून अनेक माजी सैनिकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले. यावेळी वीर माता-पिता, वीर नारी व वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला; हा प्रसंग संपूर्ण उपस्थितांसाठी अत्यंत भावूक ठरला.
२२ माजी सैनिकांना थेट सेवा व मदत
सेवा संकल्प अभियानांतर्गत एकूण २२ माजी सैनिकांना विविध सेवांचा लाभ मिळवून देण्यात आला. यात दोन माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. तसेच २० माजी सैनिक व वीरपत्नींची पेन्शन आणि विविध कल्याणकारी योजनांशी निगडित प्रकरणे स्वीकारून त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहकार्य पुरविण्यात आले.
सैन्यभरती, सायबर सुरक्षा व वाहतूक नियमांचे मार्गदर्शन
कल्याण संघटक राहुल काटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सैन्यभरतीपूर्व तयारी, शिस्त, शारीरिक क्षमता आणि संरक्षण दलातील विविध करिअर संधींची माहिती देऊन देशसेवेची प्रेरणा दिली. पोलीस निरीक्षक ओम आघाव यांनी बदलत्या काळातील सायबर गुन्हे, सुरक्षा आणि वाहतूक नियमांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ने करण्यात आला. वसतिगृह अधीक्षक योगेश बने यांनी आभार मानले. माजी सैनिकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवणारा हा उपक्रम चिपळूणकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button