पर्यटनाला चालना देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांच्या केंद्र व राज्य सरकारकडे विविध सूचना

रत्नागिरी : भारत आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला अधिक चालना मिळावी, यासाठी रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते अमेय प्रदीप परुळेकर यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री, पर्यटन संचालनालय तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे विविध सूचना मांडल्या आहेत.

पर्यटन क्षेत्रातील लहान-मोठ्या कंपन्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी परुळेकर यांनी केली आहे. तसेच देशी आणि विदेशी पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे, पर्यटनस्थळांवर पर्यटकांना त्यांच्या कुटुंबासह तसेच सामानासह सुरक्षिततेची हमी मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

पर्यटनाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने नियोजन करावे. पर्यटकांची संभाव्य संख्या, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग तसेच सुट्ट्यांच्या कालावधीचा विचार करून आधीच उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

कोकणातील हॉटेल्सचा दर्जा सुधारण्याची मागणी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठी पर्यटन क्षमता आहे. पर्यटक केवळ हॉटेलचा आकार पाहण्यापेक्षा तेथील सुविधा, निसर्गरम्य परिसर आणि मिळणारा अनुभव याला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे कोकणातील विद्यमान हॉटेल्स आणि लॉजेसचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने मदत करावी आणि त्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, अशी मागणी अमेय परुळेकर यांनी केली आहे.

तसेच पर्यटकांनी स्थानिक वस्तूंची खरेदी करताना त्यांना दर्जेदार आणि प्रमाणित वस्तू मिळाव्यात, यासाठी शासनाने आवश्यक धोरणे आखावीत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

विदेशी पर्यटकांसाठी स्वतंत्र मदत कक्षाची मागणी

पर्यटनस्थळांच्या परिसरात विदेशी पर्यटकांसाठी स्वतंत्र शासकीय मदत कक्ष असावा, अशी महत्त्वाची सूचना परुळेकर यांनी केली आहे. प्रत्येक विदेशी पर्यटकाला हिंदी किंवा इंग्रजी भाषा येईलच असे नाही. त्यामुळे विविध परदेशी भाषांमध्ये मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देणारी यंत्रणा असावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पर्यटकांना चांगला आणि सुरक्षित अनुभव मिळाल्यास ते आपल्या कुटुंबीय व मित्रांना त्या पर्यटनस्थळाची माहिती देतील तसेच भविष्यात पुन्हा भेट देतील. त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते, असा विश्वास अमेय परुळेकर यांनी व्यक्त केला आहे.

पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या सूचनांचा विचार करून केंद्र व महाराष्ट्र शासनाने आवश्यक निर्णय आणि धोरणे तयार करावीत, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button