
एसटी चालकाचा प्रामाणिकपणा! सात लाखांचे दागिने प्रवाशाला सुखरूप परत
लांजा: लांजा ते कल्याण प्रवास करणाऱ्या प्रवाशाची तब्बल सात लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने असलेली बॅग एसटी बसमध्येच राहून गेली. मात्र चालकाच्या प्रामाणिकपणामुळे ही बॅग व त्यातील सर्व दागिने सुखरूप परत मिळाल्याने संबंधित बंडबे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त लांजा आगारातून विविध मार्गांवर जादा एसटी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. याचदरम्यान मुळचे कुवे येथील रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले सुधीर नारायण बंडबे हे सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता लांजा येथून कल्याणकडे जाणाऱ्या एसटी बसने प्रवास करीत होते. प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की सुमारे सात लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने असलेली बॅग बसमध्येच राहिली आहे.
या घटनेची माहिती बंडबे यांनी त्यांच्या कुवे येथील नातेवाईकांना दिली. त्यांनतर त्या नातेवाईकांनी मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास लांजा आगाराचे वाहतूक निरीक्षक ललित आयरे यांना दिली. आयरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने संबंधित बसचा शोध घेत चालक मोतीलाल नवल कोळी यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान, बसमध्ये बॅग असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चालक कोळी यांनी ती सुरक्षितपणे ताब्यात घेतली. त्यानंतर बंडबे यांच्याशी दागिन्यांची ओळख पटवून घेत सर्व मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. विशेषतः या प्रवासातील जादा एसटी बस जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारातील असून कोळी हे चोपडा आगारात कार्यरत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही लाखो रुपयांचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल बंडबे कुटुंबीयांनी चालक मोतीलाल कोळी यांचे आभार मानले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे व कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




