
साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून अडीच लाखांचे दागिने चोरीला
गर्दीचा फायदा घेत चोरट्याचा डल्ला; २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास
संगमेश्वर ::साखरपा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील छोट्या पाकिटावर डल्ला मारून सोन्याचे मंगळसूत्र आणि अंगठी असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. विनिता विकास अवसरे (४८, गृहिणी, सध्या रा. परळ, मुंबई; मूळ रा. प्रभानवल्ली-बाणेवाडी, ता. लांजा) या पतीसह अंत्रवली (ता. संगमेश्वर) येथे जाण्यासाठी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या.
कोल्हापूर-संगमेश्वरमार्गे चिपळूण जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटावर हात साफ केला. या पाकिटात अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी होती.
दरम्यान, चोरीची घटना घडल्यानंतर अवसरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करता आली नाही. त्यांनी गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी रात्री ८.५१ वाजता देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.




