
गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; रत्नागिरी विभागात २,५०० जादा गाड्यांचे नियोजन
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष वाहतूक व्यवस्था; २० सप्टेंबरसाठी सर्वाधिक १,६६१ आरक्षणे*
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) कंबर कसली आहे. गणेशोत्सवानंतर मुंबईसह विविध शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन १९ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी विभागातून तब्बल २,५०० जादा एसटी गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातील विविध आगारांमधून आगाऊ आरक्षणाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १९ ते २७ सप्टेंबरदरम्यानच्या परतीच्या जादा वाहतुकीसाठी आतापर्यंत २,५०७ आरक्षणांची नोंद झाली आहे.
आगारनिहाय आरक्षणाचा विचार करता गुहागर आगारातून ४६०, चिपळूण ४३३, देवरूख ३४५, दापोली २६३, खेड २३४, राजापूर २३८, रत्नागिरी २००, लांजा १८७ आणि मंडणगड आगारातून १४७ आरक्षणे झाली आहेत.
२० सप्टेंबरला सर्वाधिक गर्दीचा अंदाज
दिनांकानुसार २० सप्टेंबर रोजी सर्वाधिक १,६६१ आरक्षणे झाली आहेत. त्यापाठोपाठ २१ सप्टेंबरसाठी ४५७, १९ सप्टेंबरसाठी २३७ आणि २२ सप्टेंबरसाठी ५१ आरक्षणे झाली आहेत. पुढील दिवसांसाठीही आगाऊ आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे.
गणेशोत्सवानंतर एकाच वेळी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई, पुणे आणि अन्य शहरांकडे रवाना होत असल्याने एसटी बसस्थानकांवर मोठी गर्दी होते. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
त्यामुळे गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी एसटीचा आधार घेणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, गर्दीच्या काळात वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.




