गणेश विसर्जनासाठी रत्नागिरी शहरातील वाहतूक मार्गात बदल; गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचे आदेश


*रत्नागिरी, दि. १८ (जिमाका): शहरात गौरी-गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुका आणि नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
दिनांक १९ सप्टेंबर (गौरी गणपती विसर्जन), २३ सप्टेंबर (दहा दिवसांचे गणपती), २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) आणि २६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस) या चार दिवशी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहतील.
असा असेल पर्यायी मार्ग
या कालावधीत भुतेनाका – भंडग तिठा – मांडवी समुद्रकिनारा या नेहमीच्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवून, ती भुतेनाका – मिरकरवाडा तिठा – मत्स्यालय ते मांडवी समुद्रकिनारा या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
केवळ विसर्जन वाहनांनाच प्रवेश
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनासाठी एकाच वेळी सुमारे ७ ते ८ हजार भाविक आणि विसर्जन पाहणारे नागरिक एकत्र येतात. त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न टाळण्यासाठी केवळ गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांनाच विसर्जनस्थळी प्रवेश दिला जाईल; इतर खासगी वाहनांना या भागात प्रवेश बंदी असेल.
अत्यावश्यक सेवांना सवलत
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि व्हीआयपी/शासकीय दौऱ्याशी संबंधित अधिकृत वाहनांना लागू असणार नाही. आणीबाणीच्या प्रसंगी जागेवर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
या बदलांविषयी वाहनचालक किंवा नागरिकांना काही हरकती अथवा आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून ते नोंदवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button