
रत्नागिरी शहरात आठवडा बाजारात उभ्या चारचाकीला पेटवले; अज्ञात इसमाचा प्रताप, वाहन जळून खाक
रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. आग लावण्यापूर्वी संशयिताने वाहनाच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आठवडा बाजार परिसरात उभ्या असलेल्या चारचाकीजवळ पहाटेच्या सुमारास एक अज्ञात इसम आला. त्याने प्रथम वाहनाच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर वाहनाला आग लावली. काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांच्या ही घटना लक्षात आली.
नागरिकांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच रत्नागिरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत चारचाकी वाहन मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले होते.
दरम्यान, वाहनाला आग नेमकी कोणत्या कारणातून लावण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आग लावणाऱ्या अज्ञात संशयिताचा शोध सुरू आहे.




