
समर्थ शिंदेची स्केटिंगमध्ये उत्तुंग भरारी!
१०० मीटर बॅकवर्ड इनलाईन स्केटिंग अवघ्या १७.९३ सेकंदांत; जागतिक विक्रमाची नोंद
गुहागर : प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्द असेल तर कोणतेही यश गाठता येते, हे गुहागर तालुक्यातील देवघर गावचा सुपुत्र समर्थ अस्मिता प्रशांत शिंदे याने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. स्केटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत समर्थने १०० मीटर इनलाईन स्केटिंग बॅकवर्ड हा प्रकार अवघ्या १७.९३ सेकंदांत पूर्ण करून वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या कामगिरीची नोंद केली आहे.
समर्थच्या या कामगिरीमुळे देवघर गावासह गुहागर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लहानपणापासूनच स्केटिंगची आवड असलेल्या समर्थने नियमित सराव, शिस्त, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही सरावात सातत्य राखत त्याने आपल्या कौशल्याला पैलू पाडले आणि जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करण्याचा मान मिळवला.
समर्थच्या या यशामुळे त्याचे आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच देवघर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या कामगिरीचे विविध राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी कौतुक करत अभिनंदन केले असून, भविष्यातील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर जागतिक विक्रमाला गवसणी घालणाऱ्या समर्थच्या या यशाने कोकणातील युवा क्रीडापटूंना नवी प्रेरणा मिळाली आहे




