आता शासकीय यंत्रणांचे मोठे पाऊल! कर्णकर्कश गणेशोत्सवातून पुणेकरांची होणार सुटका!!


पुणे : पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे. या मागणीला पाठिंबा देत पुणेकर नागरिक रस्त्यावर उतरले होते. आता शासकीय यंत्रणांच्या पातळीवर पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तब्बल दोनशे गणेश मंडळांच्या ठिकाणी उत्सवाच्या काळातील सर्व दिवसांत प्रत्यक्ष आवाजाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. आवाज जास्त असल्यास तो कमी करण्यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची यंदा कर्णकर्कश उत्सवातून सुटका होणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंडवडमध्ये दोनशे गणेश मंडळांच्या ठिकाणी आवाजाच्या पातळीचे मापन करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. त्याचबरोबर सात महत्त्वाच्या चौकांतही ध्वनीच्या पातळीची तपासणी करण्यात येत आहे. ध्वनिप्रदूषण पातळीचे उल्लंघन आढळल्यास संबंधित गणेश मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे म्हणाले, की गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली जात आहे. मंडळाचे अधिकारी व कर्मचारी ३०० स्वयंसेवकांच्या मदतीने हे काम करीत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सायंकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत ही पातळी मोजली जात आहे. गणेशोत्सवातील सर्व दिवस आणि विसर्जन मिरवणुकीच्या काळातही ध्वनिप्रदूषणाच्या पातळीची नोंद केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button