
चार पिढ्यांपासून घरच्या मातीपासून घडतो महाजन कुटुंबाचा बाप्पा!
कोळथरमध्ये शंभर वर्षांची परंपरा; श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश
दापोली : बाजारात विविध आकार, रंग आणि आकर्षक सजावटीच्या गणेशमूर्तींची रेलचेल असताना दापोली तालुक्यातील कोळथर येथील महाजन कुटुंब मात्र आजही आपल्या मातीतच बाप्पाला शोधत आहे. परिसरातील डोंगरातून माती आणून त्याच मातीपासून घरच्या घरी गणेशमूर्ती घडविण्याची सुमारे शंभर वर्षांची परंपरा या कुटुंबाने चार पिढ्यांपासून जपली आहे. श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविणारा हा गणेशोत्सव विशेष ठरत आहे.
कोळथर येथील सुरेश पांडुरंग महाजन, श्रीकृष्ण गोविंद महाजन, कमलाकर केशव महाजन आणि श्रीकृष्ण गोपाळ महाजन या चार कुटुंबांमध्ये आजही ही परंपरा कायम आहे. गणेशोत्सवाच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम घरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर गणेशमूर्ती तयार करण्यासाठी ज्या ठिकाणाहून माती आणली जाणार असते, त्या जागेची विधिवत पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर वाजतगाजत माती घरी आणण्याची परंपरा आहे.
घरी आणलेली माती व्यवस्थित मळून घेतल्यानंतर कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन बाप्पाची मूर्ती घडविण्यास सुरुवात करतात. मूर्ती तयार करण्यापासून तिच्या रंगकामापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया कुटुंबातील सदस्य स्वतःच पार पाडतात. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मूर्ती घडविण्याची प्रक्रिया सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी बाराच्या सुमारास पूर्ण होते आणि घरच्या मातीतील बाप्पाचे सुंदर रूप साकारते.
मूर्ती तयार झाल्यानंतर षोडशोपचारे पूजा-अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र मूर्ती पूर्णपणे सुकलेली नसल्याने या कुटुंबात दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी वाजतगाजत बाप्पाला समुद्रकिनारी नेले जाते. तेथे आरती करून धार्मिक विधी पार पाडल्यानंतर गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन केले जाते.
आपल्या मातीशी नाते जपणारा पर्यावरणपूरक संदेश
शाडूच्या मातीच्या वाढत्या किमतीमुळे गणेशमूर्तींच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा पर्याय स्वीकारला जात असताना महाजन कुटुंबाची ही परंपरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वेगळा आदर्श निर्माण करते. बाजारातील आकर्षक मूर्तींच्या युगातही आपल्या परिसरातील माती आणून, स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडविण्याची ही परंपरा श्रद्धेबरोबरच आपल्या मातीशी असलेले नाते आणि निसर्गाप्रतीची बांधिलकी जपणारी ठरत आहे




