
आंबोली धबधब्यावर कुटुंबाच्या अंगावर अचानक पडला साप!
धबधब्याचा आनंद घेत असतानाच थरार; महिलांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावर सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका कुटुंबासोबत अचानक थरारक घटना घडली. धबधब्याजवळ कुटुंबातील सदस्य निवांत बसले असतानाच वरून अचानक साप थेट एका व्यक्तीच्या अंगावर किंवा अगदी जवळ पडला. या प्रकारामुळे उपस्थितांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये धबधब्याजवळील खडकांवर काही महिला आणि मुली बसलेल्या दिसत आहेत. याचवेळी एक व्यक्ती लहान मुलाला कडेवर घेऊन त्यांच्या दिशेने येताना दिसते. अचानक त्याच क्षणी वरून एक साप खाली पडतो.
साप दिसताच महिलांसह मुलींच्या जोरदार किंकाळ्या सुरू होतात. आजूबाजूला असलेले पर्यटकही घाबरून मागे सरकताना दिसतात. काहीजण एकमेकांना “बाजूला व्हा, बाजूला व्हा” असे सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते.
साप मात्र काही क्षणांतच खडकांमधून आणि वाहत्या पाण्यातून वेगाने सरपटत पुढे जातो आणि नंतर नजरेआड होतो. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे काही काळ धबधब्याच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नाग की मण्यार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सापाच्या प्रजातीबाबतही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काही जणांनी हा कोब्रा अर्थात नाग असल्याचा दावा केला आहे, तर काहींच्या मते तो कॉमन क्रेट म्हणजेच मण्यार असू शकतो. मात्र, व्हिडिओच्या आधारे सापाची नेमकी जात निश्चितपणे सांगता येत नाही.
साप कोणत्याही जातीचा असो, पर्यटकांच्या अगदी जवळ घडलेला हा प्रकार चांगलाच धडकी भरवणारा होता. विशेषतः धबधब्याच्या निसरड्या खडकांवर आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ पर्यटकांनी अधिक काळजी घेण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.


