संगमेश्वर तालुक्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते रखडले, गणेशोत्सवापूर्वी निधी जमा करण्याची शेतकर्‍यांची मागणी


केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ’नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा नववा आणि दहावा हप्ता रखडल्याने संगमेश्वर तालुक्यातील हजारो शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत आहेत. गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असताना शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दोन्ही हप्त्यांची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता महाराष्ट्र शासनाने दि. २५ मार्च २०२६ रोजी लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केला होता. त्यानंतर नववा आणि दहावा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी या निधीच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजना तसेच कर्जमाफी यांसारख्या योजनांमुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांसाठी निधी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याची चर्चा शेतकरी वर्गात आहे. मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. गणेशोत्सवासाठी कोकणातील अनेक शेतकरी कुटुंबांची आर्थिक तयारी सुरू झाली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर घरातील विविध खर्च वाढलेले असताना नमो शेतकरी योजनेचा निधी मिळाल्यास शेतकर्‍यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी नववा आणि दहावा हप्ता तातडीने वितरित करावा, अशी मागणी होत आहे.
केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून ही योजना राबवली जाते. त्यामुळे शासनाने विलंब न करता आवश्यक निधीची तरतूद करून नववा आणि दहावा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या पोस्ट तसेच बँक खात्यांवर तातडीने जमा करावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button