
तिवरे धरण दुर्घटना प्रकल्पग्रस्तांना गणेशोत्सवापूर्वी मिळाली हक्काची घरे; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपयांचे दर्जेदार घर; देशातील वैशिष्ट्यपूर्ण पुनर्वसन प्रकल्प-दुर्घटनेतून बचावलेल्या चिमुकल्या रुद्रच्या हस्ते झाले त्याच्या घराचे उद्घाटन

रत्नागिरी, दि. १२ ) : तिवरे धरण दुर्घटनेतील बाधितांच्या दुःखावर फुंकर घालत, दुर्घटनेत जीव गमावलेल्या व बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते अलोरे येथे पार पडले. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला प्रकल्पग्रस्तांना हक्काची घरे सुपूर्द करत शासनाने दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपये खर्चून ही सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यात यश आले असून, हा देशातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरला असल्याचे डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले.
तिवरे भेंदवाडी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत अलोरे येथील घर क्र. २५ ते ४३ आणि तिवरे येथील ४४ ते ५७ घरांच्या बांधकामांचे लोकार्पण चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे संपन्न झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाधितांना सदनिकांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. या सोहळ्यास आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांना घरे देणे हे उपकार नव्हे, कर्तव्य : डॉ. उदय सामंत
लोकार्पणप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, “प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना घरे देऊन कोणतेही उपकार केलेले नाहीत, तर हे आमचे कर्तव्य होते. दुर्घटनेच्या वेळी दिलेला शब्द आज प्रत्यक्ष पूर्ण होत आहे. यातील एका जरी घरात यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाची प्रतिष्ठापना झाली, तरी तो आम्हा सर्वांसाठी परमोच्च आनंद असेल. तिवरे गावासारखी दुर्दैवी परिस्थिती देशात पुन्हा कोणावरही येऊ नये, अशी प्रार्थना गणरायाचरणी करतो.” तसेच नवीन वस्तीत सर्वांनी एकोप्याने व जबाबदारीने राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
चिमुकल्या रुद्रच्या भवितव्याची काळजी घेणे समाजाचे कर्तव्य
या दुर्घटनेतून बचावलेल्या ‘रुद्र’ या चिमुकल्याच्या हस्ते त्याच्या नवीन घराचे उद्घाटन करण्यात आले. याबाबत विशेष भावना व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, रुद्रला देशाचा सुजाण व यशस्वी नागरिक घडविण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येकाची आहे. त्याचे अत्यंत संवेदनशीलतेने पालनपोषण व्हावे आणि तो सज्ञान झाल्यावर त्याची मालमत्ता व सर्व हक्क सुरक्षितपणे त्याच्या स्वाधीन व्हावेत, यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
शासकीय बांधकामांच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका
शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य विनियोग झालाच पाहिजे, यावर भर देत डॉ. सामंत यांनी शासकीय बांधकामे दर्जेदार आणि अव्वल दर्जाचीच झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश दिले. कोणत्याही कामात निकृष्ट दर्जा आढळल्यास त्याची तात्काळ सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रांताधिकारी लिगाडे यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाची पार्श्वभूमी मांडली, तर आमदार शेखर निकम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.



