गणरायाच्या स्वागतासाठी रत्नागिरी नगर परिषद सज्ज!


१४ सप्टेंबरपर्यंत शहरातील सर्व खड्डे बुजवणार; फळविक्रेत्यांसाठी मैदाने खुली, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन


रत्नागिरी प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील नागरिकांसह मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद सज्ज झाली आहे. शहरातील रस्ते, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, वाहतूक व्यवस्था, गणेश विसर्जन तसेच फुटपाथवरील व्यवसायिकांच्या व्यवस्थेबाबत नगर परिषदेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. १४ सप्टेंबरपर्यंत शहरातील उर्वरित खड्डे बुजवून रस्ते खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी दिली.

गुरुवारी (१० सप्टेंबर) नगर परिषदेच्या नवीन कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी गणेशोत्सवाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, आरोग्य सभापती राकेश नागवेकर, बांधकाम सभापती बंटी कीर, नगरसेवक राजेश तोडणकर, अमित विलणकर, सुहेल साखरकर, प्रिती सुर्वे, दत्तात्रय (बाळू) साळवी आदी उपस्थित होते.

६० टक्के खड्डे बुजवले; उर्वरित काम वेगाने

रत्नागिरी शहरातील जवळपास ६० टक्के खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित खड्डेही गणेशोत्सवापूर्वी बुजवण्यात येणार आहेत, असे नगराध्यक्षा सुर्वे यांनी सांगितले. शहरातील नागरिक आणि गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.

फुटपाथवरील विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा

शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून फुटपाथवर फळविक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी नगर परिषदेच्या हद्दीतील विविध मैदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. साळवी स्टॉप परिसरातील मैदान, मंगळवार बाजार मैदान, लक्ष्मी चौक मैदान आणि आठवडा बाजार परिसर अशा ठिकाणी विक्रेत्यांनी स्टॉल लावून व्यवसाय करावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.

फुटपाथ किंवा रस्त्यावर व्यवसाय केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनीही रस्त्यावर वाहने उभी करून अशा ठिकाणी खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक टपरी व्यावसायिकांसाठी दर्जेदार स्टॉल

शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांसाठी चांगल्या दर्जाचे स्टॉल उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे व्यवसायिकांना पर्यायी सुविधा मिळण्याबरोबरच शहरातील वाहतूक आणि पादचारी मार्गावरील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे.

स्ट्रीट लाईट, स्वच्छतेवर विशेष भर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व भागांतील स्ट्रीट लाईटची तपासणी सुरू आहे. ज्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था उपलब्ध नाही किंवा दिवे बंद आहेत, तेथे विद्युत विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस काम करून व्यवस्था सुरळीत करीत आहेत.

सार्वजनिक रस्ते, गल्ली-बोळ, समुद्रकिनारे आदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर कचरा दिसू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

कृत्रिम तलावासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था

गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच मांडवी समुद्रकिनारी निर्माल्य संकलनासाठी विशेष कलश ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सुर्वे यांनी दिली.

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण; मोकाट गुरांवरही उपाययोजना

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरही नगर परिषदेकडून उपाययोजना सुरू आहेत. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी निविदा काढण्यात आली असून लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मोकाट गुरांच्या प्रश्नावर काही संस्थांशी चर्चा सुरू असून त्यांना गोशाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला सूचना

गणेशोत्सवाच्या काळात शहरात कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना आणि चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीतील नागरिक तसेच मुंबई व अन्य शहरांतून गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या सर्व चाकरमान्यांना नगर परिषदेच्या वतीने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत, उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचे नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button