भगवे वादळ मुंबईत धडकणार’, अंतरवालीतील महाबैठकीत मनोज जरांगे यांची मोठी घोषणा!


मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज, शनिवारी (दि. १२) पंधरावा दिवस उजाडला.राज्यभरातून लाखो मराठा बांधव आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या ऐतिहासिक व राज्यव्यापी महाबैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर बहुप्रतीक्षित मुंबई कूचची अधिकृत घोषणा केली. “आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जायचे आहे. १५ सप्टेंबरला मुंबईसाठी अंतरवाली येथून निघणार. रस्त्यात कोणी कितीही खुन्नस दिली तरी त्याला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवू नका; डोळ्यांसमोर समाजाची वेदना आणि मुलांचे भविष्य ठेवा. कोणत्याही मार्गाने गेलो तरी यंदा जिंकूनच यायचे आहे,” असा एल्गार जरांगे पाटील यांनी जनसागराला संबोधित करताना केला.

भगवे वादळ, टाळ्यांचा गजर अन् गगनभेदी घोषणाबाजी दुपारी १२ वाजता बैठक सुरू होण्यापूर्वीच अंतरवाली सराटी परिसर मराठा बांधवांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगवे रुमाल फिरवत तरुणांनी परिसर दणाणून सोडला. “एक मराठा, लाख मराठा”, “जय जिजाऊ, जय शिवराय”, “मुंबई मुंबई… आता कुठे जायचं? मुंबईला जायचं!”, “लढेंगे, जितेंगे… हम सब जरांगे”, “मनोज दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” आणि “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

समाजाची वेदना डोळ्यांसमोर ठेवा’ उपस्थितांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुंबईला जाण्याचा आपला निर्णय पक्का आहे. शांततेच्या मार्गाने, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण आपली ताकद दाखवणार आहोत. रस्त्यात कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका. आपल्या लेकरांचे कल्याण करणे हेच आपले एकमेव ध्येय आहे.”

मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या १५ प्रमुख मागण्या

महाबैठकीत राज्य शासनासमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख १५ मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

१. शिंदे समिती नोंदी: न्या. शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख नोंदींनुसार पात्र बांधवांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे वितरित करावीत.

२. हैदराबाद गॅझेटिअर: हैदराबाद गॅझेटिअरनुसार मराठवाड्यात सरसकट कुणबी प्रमाणपत्रे व जात पडताळणी प्रमाणपत्रे द्यावीत.

३. सातारा-कोल्हापूर गॅझेटिअर: सातारा व कोल्हापूर गॅझेटिअरची तात्काळ अंमलबजावणी करावी.

४. गुन्हे मागे घ्यावेत: अंतरवाली सराटीसह मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यभरात दाखल झालेले सर्व पोलीस गुन्हे मागे घेण्यात यावेत.

५. स्वतंत्र मंत्रालय: मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी.

  1. ६. जात पडताळणी: प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्रे तातडीने जारी करावीत.

७. ओबीसी सवलती: ओबीसी प्रवर्गाला मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती व सुविधा मराठा समाजाला लागू करून प्रत्यक्ष लाभ द्यावेत.

८. सारथी योजना व वसतिगृहे: सारथी संस्थेच्या बंद योजना सुरू कराव्यात, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता (शिष्यवृत्ती) तात्काळ द्यावा आणि वसतिगृह सुविधा पुरवाव्यात.

९. बलिदान दिलेल्यांना मदत: आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसांना शासकीय नोकरी व आर्थिक मदत द्यावी.

१०. शिंदे समितीचे कार्य: न्या. शिंदे समितीचे नोंदी शोधण्याचे काम पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करावे.

११. महावितरण भरती: महावितरण जाहिरात क्र. ०६/२०२३ मधील ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी.

१२. अण्णासाहेब पाटील महामंडळ: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील प्रलंबित व्याज परतावे त्वरित वितरित करावेत.

१३. सगे-सोयरे अधिसूचना: सगे-सोयरे मसुदा अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून तात्काळ अंमलबजावणी करावी.

१४. संस्थांमध्ये समानता: सारथी व इतर शासकीय कल्याणकारी संस्थांच्या योजनांमध्ये समान धोरण लागू करावे.

१५. जात प्रमाणपत्र अपील प्रक्रिया: रद्द करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांबाबत पारदर्शक व न्याय्य अपील प्रक्रिया राबवावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button