
एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३६ जागांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती; ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. १० ): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामार्फत विविध १२ कार्यशाळा व्यवसायातील अर्हताधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी एकूण ४३६ जागा भरल्या जाणार असून, पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन रत्नागिरी राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.
दोन्ही पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक
इच्छुक उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. यासोबतच, आवश्यक त्या सर्व मूळ व साक्षांकित कागदपत्रांसह नमुना अर्ज रत्नागिरी येथील राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयात स्वतः उपस्थित राहून ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी व जागांचा तपशील
प्रस्तुत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षाचा राहील. विविध १२ व्यवसायांतर्गत भरल्या जाणाऱ्या ४३६ जागांचा तपशील खालीलप्रमाणे:
- यांत्रिक डिझेल: ११० जागा
- यांत्रिक मोटारगाडी: ११० जागा
- साठा जोडारी: ५० जागा
- पत्राकारागीर: ५० जागा
- वीजतंत्री: ४० जागा
- सांधाता: २० जागा
- रंगारी: २० जागा
- कातारी: १० जागा
- यंत्र कारागीर: १० जागा
- रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग: १० जागा
- शिवणकाम: ०४ जागा
- सुतार: ०२ जागा
सदर भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, प्रक्रियेत अंशतः बदल करणे अथवा पदांच्या संख्येत वाढ किंवा घट करणे याबाबतचे सर्व अंतिम अधिकार विभाग नियंत्रक, रा.प. रत्नागिरी विभाग यांच्याकडे राखीव राहतील, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.




