मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे फ्लायओव्हरला भेगा; दुरुस्तीच्या नावाखाली चक्क ‘काचपट्टी’! ठेकेदाराच्या कामावर संताप


उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद; तडे गेलेल्या संरक्षक भिंतीवर एमसील-काचपट्टी लावल्याचा दावा


नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील फ्लायओव्हरच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत संरक्षक भिंतीला मोठ्या भेगा पडल्याने हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आता या भेगा बुजवण्यासाठी चक्क एमसील लावून त्यावर काचपट्ट्या बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ही नेमकी दुरुस्ती आहे की तात्पुरती मलमपट्टी, असा सवाल वाहनचालक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. सरकारकडून महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले, तरी नागोठणे, कोलेटी, वाकण, कोलाड, इंदापूर आणि माणगाव परिसरातील विविध पुलांची कामे अद्याप प्रश्नांच्या भोवऱ्यात आहेत.

उद्घाटनानंतर दोन महिन्यांतच भेगा

नागोठणे येथील मुरावाडी ते इंद्रप्रस्थ हॉटेलदरम्यानच्या फ्लायओव्हरच्या संरक्षक भिंतीला मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले. काही ठिकाणी सिमेंट ब्लॉकला तडे गेले असून संरक्षक भिंतीला बाक आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

पावसाळ्यात भेगांमधून पाणी झिरपल्याने संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मात्र, मजबूत आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी भेगा पडलेल्या ठिकाणी एमसील आणि काचपट्ट्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. काही ठिकाणी खुंट्याही ठोकण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पद्धतीमागे नेमके अभियांत्रिकी कारण काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘सुरक्षेच्या नावाखाली मलमपट्टी कशासाठी?’

फ्लायओव्हरची उंची सुमारे २५ फुटांपर्यंत असून त्यावर मातीचा भराव असल्याचे सांगितले जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हिस रोडवरील वाहतूक वाढणार असल्याने संरक्षक भिंतीला धोका निर्माण झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

“एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येणार का?” असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागोठणे विभागप्रमुख प्रकाश मेस्त्री यांनी उपस्थित केला आहे.

‘काचपट्टी’ नेमकी कशासाठी?

फ्लायओव्हरच्या संरक्षक भिंतीवरील तडे तपासण्यासाठी काचपट्टी लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही पद्धत संरचनेच्या सुरक्षिततेचे परीक्षण करण्यासाठी आहे की तात्पुरत्या दुरुस्तीचा भाग आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

त्यामुळे “धोकादायक फ्लायओव्हरची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार?” आणि “गणेशोत्सवाच्या काळात या मार्गाची सुरक्षितता कोणाची जबाबदारी?” हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.

नागोठणे फ्लायओव्हरच्या बांधकामाची तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button