जेएसडब्ल्यू एनर्जीचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भिवबुंदर येथे अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित, आणखी एक अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात येण्याची शक्यता


राज्याची ऊर्जेची गरज पूर्ण करताना ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे अणुऊर्जेच्या निर्मिती क्षमतेत मोठी वाढ शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.राज्यात टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू समवेत सरकारने आज सामंजस्य करार केले असून ४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यातून ७९ हजार कोटींची गुंतवणूक आणि ११ हजार ७०० रोजगार उपलब्ध होणार आहेत. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महापारेषणचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार तसेच महाजनकोचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्णन बी., तसेच समीर मेहता, टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड सोबत झालेल्या या दोन करारांमुळे महाराष्ट्राच्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेला आणखी बळ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या करारात जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भिवबुंदर (आगरी गाव) येथे प्रस्तावित असून, त्याची क्षमता ४ x ७०० मेगावॅट म्हणजेच एकूण २८०० मेगावॅट इतकी आहे. प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात १४०० मेगावॅट आणि दुसऱ्या टप्प्यात १४०० मेगावॅट क्षमतेची निर्मिती प्रस्तावित आहे.

जेएसडब्ल्यू एनर्जीच्या या प्रकल्पासाठी सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यासाठी २२ हजार कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यासाठी २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून सुमारे ८ हजार ते १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

टॉरंट पॉवर लिमिटेड यांचा अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातील अन्य योग्य ठिकाणी उभारण्याचा प्रस्ताव असून, त्याची क्षमता २ x ७०० मेगावॅट म्हणजेच १४०० मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, त्यातून सुमारे १७०० रोजगार निर्मिती होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button