मध्यरात्री घराला भीषण आग; सहा तरुणांच्या प्रसंगावधानाने दोन वृद्धांसह कुटुंबीयांचे प्राण वाचले!


गुहागर-खालचापाट येथील घटना; घर पूर्णपणे जळून खाक, सुमारे १३ लाखांचे नुकसान


गुहागर-खालचापाट येथे मंगळवारी मध्यरात्री सचिन बामणे व संतोष बामणे यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करत संपूर्ण घराला कवेत घेतले. या दुर्घटनेत घरातील मोठे नुकसान झाले असून, सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, परिसरातील सहा तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे घरातील दोन वृद्धांसह कुटुंबीयांचे प्राण वाचले.

मध्यरात्री माळ्यावर दिसला संशयास्पद उजेड

मंगळवारी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास वेदांग कनगुटकर, विराज शिंदे, शुभम शिंदे, धनराज ओक, स्वानंद दीक्षित आणि आर्य खोत हे सहा तरुण कानडे यांच्या घराबाहेर गप्पा मारत बसले होते. याचवेळी त्यांना सचिन बामणे यांच्या घराच्या माळ्यावर अचानक उजेड दिसला.

हा उजेड विजेच्या दिव्याचा नसल्याचे लक्षात येताच तरुणांनी बारकाईने पाहिले. तोपर्यंत माळ्यावरील आगीने गंभीर स्वरूप धारण केले होते. काही क्षणांतच पहिल्या मजल्यावरील खिडक्यांच्या काचाही आगीच्या तीव्रतेमुळे फुटल्या.

आधी जीव वाचवला, नंतर आग विझवण्यासाठी धावपळ

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच तरुणांनी तातडीने सचिन बामणे यांच्या घराच्या मागे राहणाऱ्या संतोष बामणे यांच्या मुलगा धीरज याला फोन करून उठवले. त्यानंतर त्याच्या मदतीने घरातील सर्व सदस्यांना झोपेतून उठवून सुरक्षितपणे घराबाहेर काढले.

घरात दोन वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनाही बाहेर काढण्यासाठी तरुणांनी विशेष मदत केली. तसेच आसपासच्या ग्रामस्थांना घटनेची माहिती देण्यात आली.

तरुणांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच घरातील नागरिकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

दोन अग्निशमन बंब दाखल

आगीची माहिती मिळताच आरजीपीपीएल आणि कोकण एलएनजीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तास अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

या आगीत संपूर्ण घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button